News Flash

गडकरींचा घोषणांचा वर्षांव!

येत्या महिनाभरात देशातील टोल आकारणीबाबत नवे धोरण निश्चित करण्यात येणार असून सर्व महामार्गावर ई-टोल पद्धत सुरू झाल्यावर देशभरात सुमारे ८८ हजार कोटी रुपये वाचतील, असा

| January 2, 2015 04:33 am

येत्या महिनाभरात देशातील टोल आकारणीबाबत नवे धोरण निश्चित करण्यात येणार असून सर्व महामार्गावर ई-टोल पद्धत सुरू झाल्यावर देशभरात सुमारे ८८ हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. दक्षिण मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत यापुढे कोळसा व लोखंड उतरविले जाणार नाही. केवळ द्रवरूप इंधन व पदार्थ उतरविले जातील आणि त्यांची वाहतूक पाईपलाईनद्वारे होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सुमारे ७० हजार कोटी रुपयांची राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू करण्यात येत असल्याचे सांगून अनेक प्रकल्पांची कोटय़वधींची गणिते गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सोडवून दाखविली.
टोलनाक्यावर वाहनांचा वेळ वाया जातो व इंधन फुकट जाते, हेच नुकसान सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे असल्याचा अहवाल कोलकाता आयआयएमने दिला आहे. त्यामुळे ई टोल हाच सोयीचा मार्ग आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर सुमारे ३५० पैकी १४० ‘ई टोल’ नाके आहेत. राष्ट्रीय महामार्गावर टप्प्याटप्प्याने ते वाढविले जातील असे त्यांनी सांगितले. टोलमुक्तीबाबत मात्र काहीही न सांगता त्या संदर्भात अभ्यास सुरू असून नवीन टोलधोरण महिनाभरात आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कोळसा, लोखंड आदी न उतरविता केवळ पाईपलाईनद्वारे वाहतूक होणारे द्रव पदार्थ उतरविले जातील.  पोर्ट ट्रस्टच्या अतिरिक्त जागेचा वापर व्यावसायिकपणे सुशोभीकरणासाठी केला जाईल, तेथे झाडे लावली जातील, कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना ती जमीन दिली जाणार नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
अपघात कमी करणार
देशातील राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात सुमारे पाच लाख अपघात होऊन त्यात दीड लाख प्रवासी मृत्यूमुखी पडतात, तर तीन लाख जायबंदी होतात. पुढील दोन वर्षांत विविध उपाययोजना करुन हे प्रमाण किमान निम्म्याने कमी करण्याला प्राधान्य देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

भविष्यातील योजना
*मुंबईतील वाहतूक समस्या सोडवून प्रदूषणमुक्तही करणार
*मुंबई व अन्यत्रही जलवाहतुकीला प्राधान्य
*नरीमन पॉईंट-बोरीवली कॅटमरान सेवा दर ६०० रुपयांवरुन १५० रुपयांपर्यंत आणण्याचे  प्रयत्न
*पाण्यातही चालणारी बस आणणार, मुंबईत लवकरच ही बस दाखल होईल, चाचणीनंतर पुढील निर्णय
*दोन सागरी पंचतारांकित व सप्ततारांकित तरंगती हॉटेल्स मुंबईत उभारणार
*विदर्भ व मराठवाडय़ात ड्राय डॉक उभारणार
*कोकणातील दीपस्तंभ पर्यटन स्थळे करणार
*नरीमन पॉईंटला हेलिपॅड बांधणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:33 am

Web Title: nitin gadkari and his announcements
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 राज्यात साखरसंकट
2 ‘साठेबाजीविरोधी कायद्यात बदल ’
3 सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय
Just Now!
X