हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत आमची युती आहे आणि ही युती राहिली पाहिजे. कधी कधी “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती येते असं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करत देवेंद्रला लहानपणापासून ओळखतो, ते फार सुसंस्कृत आहेत, “साम दाम दंड भेद” म्हणजे सर्व ताकद लावा असा अर्थ होतो असं त्यांनी सांगितलं.

नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीवर बोलताना इंधन दरवाढ हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम असल्याचं यावेळी सांगितलं. तसंच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला येण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलताना, संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जी येण्यात गैर काय असा प्रश्न विचारला. प्रणब मुखर्जी कार्यक्रमाला आले तर स्वागतच असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांना सोशल मीडियावर काही प्रकरणांमध्ये तुमच्या कुटुबियांची नावे घेतली जातात असं विचारलं असता, सोशल मीडियात कोणीही काहीही टाकतं. माझ्या कुटुंबाचा कशाशी काही संबंध नाही. असेल तर छापून टाका असं सांगितलं.