महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात आमची लढाई आहेच, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रालोआच्या विस्तारासाठी जास्तीत-जास्त मित्र जोडण्याचा प्रयत्न राहील, असे सांगत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भविष्यात राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे संकेत दिले. शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीची भाजपला गरज नाही, अशी जाहीर वक्तव्ये गोपीनाथ मुंडे व रालोआच्या घटक पक्षांतील नेत्यांनीही अनेकदा केली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गडकरी यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपला सत्तेचे गणित जमविण्यासाठी जास्तीत-जास्त मित्र जोडून रालोआचा विस्तार करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्या वेळच्या परिस्थितीवर सारे काही अवलंबून आहे, असे गडकरी यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात म्हणाले. मात्र सध्या तरी राष्ट्रवादीबरोबर युती करण्याचा विषय भाजपच्या अजेंडय़ावर नाही, असे त्यांनी सांगितले. अर्थात भविष्यातील राजकारणाची आताच उत्तरे देणे शहाणपणाचे नसते, अशी गुगली टाकायलाही ते विसरले नाहीत. एका बाजुला पवार-मुंडे असा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे गडकरी-पवार एकाच व्यासपीठावर असतात हा काय प्रकार आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, शरद पवार यांची शेतीतील जाण उत्तम आहे. त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. दिल्लीतही मी त्यांना अनेकदा भेटतो, शेतीच्या प्रश्नावर चर्चा होते आणि राजकारणावरही होते, याचा गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. विरोधी नेते सरकारबरोबर सेटिंग करतात, असा जाहीर आरोप पवारांनीच केला होता, असे निदर्शनास आणल्यानंतर सध्या आपले राष्ट्रीय पातळीवर काम सुरू आहे, महाराष्ट्रापासून सध्या आपण दूर आहोत, असे सांगून त्यांनी या प्रश्नाला खुबीने बगल दिली.