गोव्यामध्ये मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले, विधानसभेत सरकारने बहुमतही सिद्ध केले. ४० पैकी १७ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेचा दावा करण्यापूर्वीच, केवळ १३ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजपने एका रात्रीत  चमत्कार करून बहुमताचा जादूई आकडा गाठला, आणि काँग्रेसला सुरूंग लावला.. गोव्याच्या सत्तास्थापनेच्या खेळात सारे फासे हाती घेतलेल्या नितीन गडकरी यांच्या शब्दांत या खेळाचे धावते वर्णन ऐकण्याची संधी मुंबईतील पत्रकारांना मिळाली, आणि काही पत्ते हातचे राखूनही या खेळाचे खुमासदार वर्णन गडकरी यांनी केले..

ही तर खेळाची सुरुवात आहे, काँग्रेसच्या एका सदस्याचा राजीनामा ही नव्या सिनेमाची झलक आहे. खरा सिनेमा पुढेच आहे असे सांगत नितीन गडकरी यांनी काँग्रेसला आणखी धक्के देण्याचे संकेत दिले, आणि गोव्यातील सरकारस्थापनेची पटकथा गडकरी यांनी त्यांच्याच शब्दांत खुलवत नेली..

विधानसभेचा निकाल आल्यानंतर संध्याकाळी सात वाजता पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा फोन आला. भेटण्यासाठी येतोय, असे ते म्हणाले. पण,  ‘तुम्ही कशाला मीच येतो’ असे सांगत मी त्यांच्या घरी पोहोचलो. अमितभाईंबरोबर गोव्यातील राजकीय परिस्थितीची सविस्तर चर्चा झाली. आमची संख्या केवळ १३ असल्याने सरकार स्थापन करणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले, पण आपल्याला गोव्यात सरकार स्थापन करायचे आहे अशी इच्छा अध्यक्षांनी व्यक्त केली, आणि तुम्हाला गोव्याला जावे लागेल असा हुकूमच त्यांनी सोडला. ही कामगिरी पार पाडण्यासाठी खाजगी विमानाने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोव्यात पोहोचलो. प्रवासादरम्यानच गोव्यातील प्रमुख नेते अन्य स्थानिक पक्षांशी चर्चा केली. गोव्यातील ताज वेदांता मध्ये मनोहर पर्रिकर व अन्य काही नेत्यांशी चर्चा करीत असतांनाच गोव्यातील जनतेचे एक शिष्टमंडळ भेटले. पर्रिकरजी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात परतले आम्हाला उचित वाटत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दीड वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे सुदिन ढवळीकर यांची भेट झाली. त्यांचे आणि माझे जुने सबंध. त्यांची थोडी नाराजी होती. पण चेर्चेत ती दूर झाली. त्यानंतर गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई यांची भेट झाली. दोघांचीही एकच अट होती. पर्रिकर मुख्यमंत्री होणार असतील तरच पाठिंबा. चर्चेचे हे गुऱ्हाळ पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालले. त्यानंतर अमित शहांना फोन करून दोन्ही पक्षांची भूमिका त्यांच्या कानावर घातली. ‘पंतप्रधान आता झोपले असून सात वाजता त्यांच्याशी चर्चा करतो. तसेच संसदीय मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करावी लागेल’ असे शहा यांनी सांगितले. पर्रिकर यांना साडेआठ वाजता येण्यास सांगून मीही झोपी गेलो. सकाळी साडेआठ वाजता अध्यक्षांचा फोन आला. गोव्यात सरकार येणार असेल तर पर्रिकरना पाठविण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लागलीच पुन्हा एकदा दोन्ही पक्षांशी चर्चा केली तेव्हा अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत सरदेसाई यांनी मागितली. त्यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. ‘राजकारणात संधी क्वचित मिळते. लगेच निर्णय घ्या, नाहीतर आम्ही निघालो दिल्लीला’ असे सांगितल्यावर त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. दोन्ही पक्षांच्या सहा सदस्यांच्या पाठिंब्याची पत्र घेतली. एक अपक्ष आमच्यासोबतच होता. मात्र एक अपक्ष पत्र देत नव्हता. येतो येतो असे सांगत होता. अखेर तुझे मंत्रीपद रद्द दुसरा अपक्ष येतोय असा निरोप देताच तो धावत आला आणि पाठिंब्याचे पत्र दिले. बहुमताचा जादूई आकडा गाठताच पर्रिकरांना सांगितले थेट राज्यपालांना फोन लावा. त्यांची वेळ लगेच मिळाली आणि सरकार स्थापनेचा दावा केला..