News Flash

दारूबंदीवरून महाराष्ट्राचे उलटे पाऊल

राज्यात जनता दलाची मोर्चेबांधणी

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत शनिवारी गोरेगावमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    (छाया- प्रशांत नाडकर) 

नितीशकुमार यांची सरकारवर टीका; राज्यात जनता दलाची मोर्चेबांधणी

बिहारमध्ये दारूबंदीमुळे भगिनी खूश झाल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रीय महामार्गालगतच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आटापिटा करीत असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी केला.

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी नितीशकुमार यांच्या उपस्थितीत संयुक्त जनता दलात प्रवेश केला. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी, तर कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे पुत्र शशांक यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी बोलताना नितीशकुमार यांनी बिहारमधील दारूबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. महाराष्ट्रातही ही मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करणे आवश्यक होते; पण राज्यातील फडणवीस सरकार दारूची दुकाने कशी सुरू राहतील याची पळवाट काढत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील महिला वर्गाला फडणवीस यांची ही कृती मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.

हे भाजपचे अपयश

बिहारमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. ही आकडेवारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रात मात्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याच्या आकडेवारीकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा, पाटीदार किंवा जाट समाजाच्या आरक्षणांच्या मागणीवर तोडगा काढण्यात भाजप सरकारांना अपयश आल्याची टीकाही त्यांनी केली.

विरोधकांची मोट बांधण्यावर भर

केंद्रातील भाजप सरकारच्या नकारात्मक भूमिकेवर टीका करताना नितीशकुमार यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याकरिता विरोधी पक्षांनी एकत्र येण्यावर भर दिला. यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये सर्व समविचारी पक्ष एकत्र लढले आणि भाजपने साम, दाम साऱ्यांचा वापर करूनही त्यांचा पराभव झाला होता. बिहारचा हा प्रयोग देशात केल्यास भाजपला पराभूत करणे शक्य असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:21 am

Web Title: nitish kumar on maharashtra government about alcohol ban
Next Stories
1 उद्योजकतेला पूरक अभियांत्रिकी अभ्यासक्रम!
2 पुणे, नांदेडमध्येही दारू दुकानांचा मार्ग मोकळा!
3 एसटी कर्मचाऱ्यांना सहा लाखांचे विमाकवच
Just Now!
X