नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार, अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली असली तरी सत्ताधारी महाविकास आघाडीने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अधिवेशनच्या अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक घेण्याबाबत विचार सुरू असून, आवाजी मतदानाने निवड करता येते का, याचीही चाचपणी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. विधान परिषदेतील रिक्त १२ जागांवर लवकर निर्णय घ्या, अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे.

राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उभयतांमध्ये नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक लवकर घ्यावी, असे पत्र राज्यपालांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठविले आहे. राज्यपालांनी विचारणा केली तरी अद्याप विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत सत्ताधाऱ्यांनी काहीच निर्णय घेतलेला नाही. अध्यक्षांची निवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन तो राज्यपालांना कळविला जाईल, असे सांगण्यात आले.

सरकारने विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याने संतप्त झालेले राज्यपाल हात धुऊन मागे लागणार, हे गृहीत धरून सत्ताधाऱ्यांनीही सावध पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  अध्यक्षपद रिक्त असल्याने निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांनी पत्र पाठविले असले तरी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची पदे रिक्त आहेत, याकडेही राज्यपालांनी लक्ष द्यावे, अशी टिप्पणी विधिमंडळ कामकाजमंत्री अनिल परब यांनी केली.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते; पण मतांची फाटाफूट झाल्यास सरकारची पंचाईत होऊ शकते. ते टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये विचारविनिमय सुरू असून ती आवाजी मतदानाने घेता येईल का, याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्लाही घेण्यात येत आहे.

विधानसभेत बहुमत असतानाही आपल्याच आमदारांवर सरकारचा विश्वास नाही. असे घाबरट सरकार आतापर्यंत पाहिले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.