देशातील बंदरे ही देशाची संपत्ती असून या बंदरांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची ग्वाही केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी जेएनपीटीने उरण पनवेल महामार्गालगत उभारलेल्या शिवस्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी दिली.

काही दिवसांपूर्वी जेएनपीटीकडून बंदराच्या खाजगीकरणाचे संकेत दिल्याने कामगारांमध्ये असंतोष होता. या विरोधात मंत्र्यांसमोर निदर्शने करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

जेएनपीटी बंदराकडून उभारण्यात आलेले शिवस्मारक, बंदरातून वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी मोबाइल एक्स-रे कंटेनर स्कॅनर, बंदरात २२० – ३३० केव्ही क्षमतेचे सबस्टेशन, वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेला उड्डाण पूल आदी विविध प्रकल्पांचे उद्घाटन शनिवारी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, आमदार महेश बालदी तसेच जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील व भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जेएनपीटीकडून उभारण्यात आलेल्या शिवस्मारकातील दालनांचेही उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग चित्ररूपात आहेत. ही अप्रतिम चित्रे  शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहेत असे मांडविया यांनी सांगितले.