संदीप आचार्य 
मुंबई: राज्य शासनाच्या तिजोरीत महसुलाच्या रूपाने मोठी भर घालणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामगिरीस करोना विषाणूचा जबर फटका बसला आहे. दरमहा शेकडो कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या या विभागातील व्यवहार नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पूर्णपणे थंडावले असून, मालमत्तांची खरेदीविक्री, भाडेकरार, अन्य महत्वाच्या दस्तावेजांची नोदणी आदींच्या शुल्करूपाने जमा होणारा महसूलाचा स्रोत पुरता आटला आहे. महिनाभरापूर्वी एकाच महिन्यात जवळपास चारशे कोटींचा महसूल गोळा करणाऱ्या या विभागात एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवडाअखेरपर्यंत जेमतेम ४३ हजार रुपये मुद्रांक शुल्कापोटी जमा झाल्याचे विषण्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, एप्रिल महिन्याच्या पहिल्या २५ दिवसांत मालमत्ता खरेदी विक्री किंवा अन्य कोणत्याही दस्तावेजाचा एकही व्यवहारच झालेला नाही. भाडेकराराच्या केवळ २७ दस्तावेजांची मुंबईत नोंद झाली असून त्यापोटी जमा झालेल्या ४३ हजारांच्या महसुलामुळे या विभागाच्या तिजोरीवर करोनाने मोठा आघात केल्याचे स्पष्ट झाले आहे. टाळेबंदीमुळे घरातच अडकलेल्या मुंबईकरांचे दैनंदिन जनजीवन पुरते विस्कळीत झाल्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. गेल्या महिन्यात, मार्च २०२० मध्ये याच विभागाने एकट्या मुंबईत तेजीची झळाळी अनुभवली होती. करोनाचे सावट असतानाही, या एकाच महिन्यात विक्री व्यवहारांचे तीन हजार ७९८ दस्तावेज नोंदले गेले आणि त्यापोटी तब्बल ३०४ कोटी ९८ लाख ३९ हजार २४३ रुपयांचा महसूल गोळा झाला होता.

भाडेकराराचे दोन हजार ८३५ दस्तावेज नोंदले गेले होते, व त्यापोटी चार कोटी ४३ लाख रुपयांचे शुल्क जमा झाले होते. त्याखेरीज, अन्य विविध करारपत्रे, अभिहस्तांतरणे, इत्यादींच्या नोंदणीपोटी ५० कोटींहून अधिक शुल्क गोळा झाले होते. २२ मार्चनंतर टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली, आणि या व्यवहारांना घरघर लागली. नव्या वर्षात गुढीपाडवा, अक्षयतृतीयेसारखे मुहूर्ताचे दिवस असूनही, मालमत्तांच्या बाजारपेठेवर करोना कळा दाटलेलीच राहिली. परिणामी, राज्याच्या महसुलाचा मोठा मार्ग अक्षरशः खुंटला आहे.

त्याआधी केवळ फेब्रुवारी २०२० मध्ये शुल्कापोटी जमा झालेल्या महसुलाची रक्कम तर ५०० कोटींच्या घरात होती. मालमत्ता विक्राचे सुमारे सहा हजार दस्तावेज नोंदले गेले, आणि त्याच्या शुल्कापोटी सुमारे ४३७.५० कोटींचा महसूल गोळा झाला होता. करोनाचे सावट जसजसे गडद होऊ लागले, तसतसे मालमत्तांचे व्यवहार ठप्प होताना दिसू लागले आहेत. एप्रिल २०२० मध्ये जेमतेम ४३ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क गोळा करणाऱ्या या विभागाने, गेल्या वर्षी, एप्रिल २०१९ मध्ये एकाच महिन्यात निव्वळ मालमत्ता विक्री दस्तावेजांच्या नोंदणीतूनच तब्बल ४६० कोटींची भर महसुलात घातली होती.

२०१९-२० या आर्थिक वर्षात विक्री व्यवहारांच्या दस्तावेज नोंदणी शुल्कापोटी ५४२ कटींच्या महसुलाचा उच्चांक डिसेंबर २०१९ मध्ये नोंदला गेला. गेल्या वर्षभरात मार्चअखेरपर्यंत ४०० ते ५०० कोटींच्या सरासरी मासिक महसुलाची नोंद करणारी तिजोरी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ४३ हजारांच्या महसुलापर्यंत आटल्याने, मुंबईतील मालमत्ता बाजार चिंतेत पडला आहे. मालमत्तांमध्ये झालेली कोट्यवधींची गुंतवणूक आणि हजारांच्या आत आलेली उलाढाल या व्यवसायास पुन्हा उर्जितावस्थेचे दिवस केव्हा दाखविणार ही चिंता या खात्यास भेडसावू लागली आहे.