मार्गावरील १७ स्थानकांवर एकही स्वच्छतागृह नाही

समीर कर्णुक, मुंबई</strong>

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च करून चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी मोनोरेल सेवा सुरू केली खरी, पण इथल्या १७ ‘सुसज्ज’ स्थानकांवर एकही स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. इतकेच काय तर नवीन स्थानकांवर बाकही नसल्यामुळे गाडीच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळावे लागत आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते २००९ मध्ये चेंबूर ते वडाळा या ८.२६ किलोमीटर अंतराच्या मोनो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दोन वर्षांत हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी, २०१४ला चेंबूर ते वडाळा या मार्गावर पहिली मोनो धावली. याच दरम्यान वडाळा ते गाडगे महाराज चौक या ११.२८ किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामदेखील सुरू करण्यात आले. मात्र काही हा टप्पा सुरू होण्यास मार्च, २०१९ उजाडले. या दोन्ही टप्प्यांसाठी २ हजार ४६० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्याने खर्च तीन हजार कोटींच्या घरात पोहोचला. पण इतका खर्च करूनही मोनोच्या प्रवाशांसाठी स्थानकांवर साधी स्वच्छतागृहेही नाहीत. त्यामुळे मोनो प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मोनो रेलच्या स्थानकांत सरकते जिने, उद्वाहने (लिफ्ट) अशी सोय आहे. मात्र एकाही स्वच्छतागृह नाही. सध्या गाडय़ांची संख्या कमी असल्याने २० ते ३० मिनिटांच्या अंतराने मोनो रेल धावत आहे. त्यामुळे एक गाडी चुकली तर प्रवाशांना बराच वेळ स्थानकांवर तिष्ठत उभे राहावे लागते. शिवाय चेंबूर येथून संत गाडगे महाराज चौकपर्यंत पोहचण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे स्थानकांवर स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. अनेक स्थानकांच्या परिसरातही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

मोनोची प्रवासीसंख्या पहिल्याच आठवडय़ात दोन लाखांवर गेली. मोनोचे उत्पन्नही वाढत आहे. परंतु, स्वच्छतागृहांची गरज आहे, असे मोनोच्या अधिकाऱ्यांना वाटत नसल्याचे दिसते. याबाबत एमएमआरडीच्या एका अधिकाऱ्याला विचारले असता, मोनोची स्थानके बस थांब्यांप्रमाणे असल्याने याठिकाणी स्वच्छतागृहांची गरजच नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन स्थानकांवर बाकेही नाहीत

वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा मोनोचा दुसरा टप्पा मार्चमध्ये सुरू करण्यात आला. या टप्प्यात ११ स्थानके असून ती एमएमआरडीएने सुसज्ज केली आहेत. सध्या या स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र एमएमआरडीने या स्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाच केलेली नाही. त्यामुळे गाडी येईपर्यंत प्रवाशांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते.