‘स्वच्छता अ‍ॅप’ला प्रतिसाद नसल्याने मुंबईचे मानांकन घसरण्याची चिन्हे; अवघ्या आठ हजार मुंबईकरांकडून अ‍ॅपचा वापर

देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीतील दोन वर्षांपूर्वीच्या दहाव्या क्रमांकावरून गेल्या वर्षी २९व्या क्रमांकावर पोहोचलेल्या आर्थिक राजधानीचा क्रमांक यंदा आणखी घसरण्याची शक्यता आहे. शहराच्या स्वच्छतेचे मूल्यांकन करताना तेथील नागरिकांनी केलेले मूल्यमापन महत्त्वाचे ठरणार आहे. मूल्यांकनाच्या निकषानुसार केंद्र सरकारने तयार केलेले स्वच्छता अ‍ॅप किमान एक लाख नागरिकांनी वापरून त्याद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे अपेक्षित आहे. मात्र, अवघ्या सात ते आठ हजार मुंबईकरांनी आपल्या मोबाइलवर ते डाऊनलोड केले आहे. मुंबईकरांच्या या ढिलाईमुळे महापालिकेची मात्र पंचाईत झाली आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छ शहरांची क्रमवारी ठरवण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येत्या जानेवारी महिन्यात मुंबई शहराचे मूल्यमापन करणार आहे. या पथकाच्या पाहणीत मुंबई शहर स्वच्छ दिसावे, यासाठी पालिकेच्या स्तरावर धावपळ सुरू आहे. मात्र, मूल्यांकनाच्या निकषानुसार नागरिकांनी करायचे मूल्यमापन होत नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. स्वच्छतेचे मानांकन ठरवताना त्या त्या शहरातील नागरिकांची मतेही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता’ अ‍ॅप तयार केले असून या अ‍ॅपद्वारे आपापल्या परिसरात साचलेल्या कचऱ्याची छायाचित्रे व ठिकाणाचा पत्ता महापालिकेला पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशी छायाचित्रे मिळताच महापालिकेचे कर्मचारी संबंधित ठिकाणी जाऊन तेथे स्वच्छता करणार आहेत. स्वच्छतेच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण या अ‍ॅपला मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी हे अ‍ॅप शहरातील किमान एक लाख लोकांनी डाऊनलोड करून वापरणे आवश्यक आहे; परंतु मुंबईत आतापर्यंत अवघ्या सात-आठ हजार नागरिक या अ‍ॅपचा वापर करीत आहेत. त्यातही फारच कमी मुंबईकरांकडून पालिकेकडे कचऱ्याबाबतची छायाचित्रे पाठवली जातात. त्यामुळे आता अवघ्या महिनाभरात एक लाख मुंबईकरांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी व वापरण्यासाठी उद्युक्त कसे करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

या आघाडीवरही अपयशी

  • मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमी उभारण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे कचराभूमीसाठी मिळणाऱ्या गुणांवर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे.
  • ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत प्रत्येक घरात शौचालय पुरवण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये अशी योजना राबवणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने अनेक ठिकाणी फिरती सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून दिली. मात्र, त्यानंतरही अनेक भागांत उघडय़ावरच प्रात:विधी उरकण्यात येतात.

स्वच्छताअ‍ॅप कसे मिळवाल?

केंद्र सरकारने तयार केलेले ‘स्वच्छता’ अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’च्या माध्यमातून मोबाइलवर डाऊनलोड करता येते. मोबाइलवर डाऊनलोड होत असताना या अ‍ॅपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंद करावी लागते. कचऱ्याचा ढीग, कचऱ्याने ओसंडून वाहणारी कचराकुंडी, कचऱ्याने भरलेल्या घरगल्ल्या, रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरणारा कचरा आदी दिसताच मोबाइलवर छायाचित्र काढून ते पत्त्यासह ‘स्वच्छता’ अ‍ॅपवर डाऊनलोड केल्यानंतर १२ तासांच्या आता पालिकेला तेथील कचरा उचलावा लागतो.