निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वांद्रे वरळी सी लिंकवर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात येणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत आपात्कालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या आठ आणि नौदलाच्या पाच तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, बोरीवली या भागात प्रत्येकी एक आणि अंधेरीत तीन तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी मुंबईतील ३५ शाळांमध्ये तात्पुरती निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. यात अलिबाग तालुक्यातील ४ हजार ४०७, पेण मधील ८७, मुरुड मधील २४०७, उरण मधील १५१२, श्रीवर्धन मधील २५५३ म्हसळ्यातील २३९ लोकांचा समावेश आहे. अलिबाग, थळ, नवगाव येथील कोळीवाड्यातून नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.