अनागोंदी कारभारात मध्य रेल्वेचा हात कोणीही धरू शकत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा मध्य रेल्वेने घेतलेल्या बुधवारच्या निर्णयानंतर आली. बुधवारी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गर्दी सरल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक मागे घेण्याची घोषणा केली. त्यातच आता आणखी एक नवी बाब समोर आली आहे. बुधवारी रविवारचे वेळापत्रक देण्यामागे मध्य रेल्वेने हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याचा संदर्भ दिला होता. परंतु आता हवामान खात्याने आपण मुसळधार पावसाचा इशारा दिलाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बुधवारी संध्याकाळी भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईत मुसळधार पावसाचा इशाराच दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्व संबंधित यंत्रणांना 3 जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार नसल्याचे कळवण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच अधिक माहितीसाठी त्यांनी हवामान खात्याच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, बुधवारी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. गर्दीमुळे एका ठिकाणी महिला प्रवासी लोकलमधून पडल्याचाही प्रकार घडला होता. तर काही महिलांना गर्दीमुळे चक्कर आल्याच्याही घटना घडल्या होत्या. त्यातच दुपारपर्यंत पाऊसही न झाल्याने मध्य रेल्वेला प्रवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर अखेर दुपारी मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु या सर्व प्रकारानंतर हवामान खात्याने आपली बाजू स्पष्ट केली असल्याचे मध्य रेल्वेच्याच अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचे आता समोर येत आहे.