पुढील मुख्यमंत्री मीच असेल असे फडणवीस सर्वत्र सांगत फिरताय. मात्र, परिस्थिती बदलली असून याचे भान त्यांना नसल्याने तसेच ते अद्याप स्वप्नातच आहेत, असे वक्तव्य मंगळवारी (दि.९) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, आता अजित पवारांना तेवढंच काम उरलंय, असा टोला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

मराठवाड्यासह राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याचे समोर येत असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बहुतांश ठिकाणचा खरीप हंगाम सुद्धा वाया गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे. अशा गंभीर प्रश्नाकडे बघायला मुख्यमंत्री फडणवीसांना वेळ नाही. मात्र, २०१९ मध्ये सुद्धा मीच मुख्यमंत्री असल्याची स्वप्ने त्यांना पडत असल्याची बोचरी टीका अजित पवारांनी केली होती.

ऐन सणासुदीच्या काळात राज्यात भारनियमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीस टक्यांपेक्षा कमी वसूली असणाऱ्या भागात भारनियमन करण्यात येत असून दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या दिवसात तरी पूर्णवेळ वीज पुरवठा करावा, अशा सूचना संबंधितांना देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात औरंगाबादच्या कुठल्या आमदाराला संधी मिळेल असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारला. त्यावर आम्ही तुमचाच कौल घेणार असल्याचे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.