आजी-माजी नगरसेवकांनाच विधान परिषदेत आमदार म्हणून जाण्याचे अधिकार मिळावेत, अशा ठरावाची सूचना पालिका सभागृहात शुक्रवारी चर्चेविनाच मंजूर करण्यात आली; मात्र या ठरावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास विधान परिषदेतील आमदारकी मिळविता येणार आहे.
मुंबई महापालिकेतून दोघांना विधान परिषदेत जाता येते; मात्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले अथवा वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तींना विधान परिषदेवर वर्णी लावली जाते. त्यामुळे नगरसेवकांचे आमदार बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा उमेदवार हा आजी-माजी नगरसेवक असावा अशी सुधारणा कायद्यात करावी, अशा आशयाची ठरावाची सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी शुक्रवारी पालिका सभागृहात मांडली होती. या ठरावाच्या सूचनेला एकाही नगरसेवकाने विरोध केला नाही वा त्यावर चर्चाही केली नाही. चर्चेविनाच महापौर स्नेहल आंबेकर यांनी या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली.
आता ही ठरावाची सूचना पालिका आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.