संदीप आचार्य

मुंबई: करोना विषाणूचे आव्हान खूप मोठे आहे. सरकारने हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवली आहे व लागेल ते करायची तयारी आहे. आता सर्वात महत्वाचे आहे तो लोकांचा सहभाग. लोकांनी मास्क, सॅनिटझेशन व सोशल डिस्टसिंग या तीन शस्त्रांचा वापर केला तर हे युद्ध नक्की जिंकता येईल असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत भारतातील करोना संकटापासून ते महाराष्ट्र व मुंबईसारख्या शहरातील करोनाचा सामना सरकार नेमक्या कशा पद्धतीने करत आहे. त्याचे दृष्य परिणाम व लोक जबाबदारीचे महत्व यावर विस्ताराने भाष्य केले. “संपूर्ण जगासाठीच हे एक वेगळे संकट आहे. नेमका याचा सामना कसा करायचा हा सर्व देशांपुढेच एक आव्हान होते. अमेरिका, इटलीसह अनेक युरोपीयन देशात करोनाच्या मृत्यूने थैमान घातलं तेव्हा भारतात नेमकं काय होणार, आपण हा सामना कसा करणार हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. करोनावर आजही ठोस उत्तर मिळालेले नाही. जगभागात करोनावरील लस शोधण्याचे काम सुरु असून यात भारतातील काही कंपन्यांचे मोलाचे योगदान आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आपण संपूर्ण लॉकडाउन जाहीर केले.”

“महाराष्ट्रातही लॉकडाउन जाहीर करण्याबरोबरच करोना रुग्ण, त्यांच्या संपर्कातील लोक शोधणे, चाचण्यांचे प्रमाण वाढवणे, तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्कफोर्स नेमून उपचाराच्या दिशा निश्चित करतानाच मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल याचा सतत अभ्यास करण्याचे काम चालवले. महत्वाचे म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर, उपचारांची जबाबदारी घेणारी वैद्यकीय मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय निर्माण करून प्रभावी उपचार व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालवले आहे” असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले. “मला मान्य आहे की, संपूर्ण देशातील कोणत्याही अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे. मृत्यूंचे प्रमाणही जास्त असून यामागची कारणे लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला परदेशातून आलेल्या लोकांमधून पसरलेला संसर्ग, मुंबई, पुणे, ठाणे तसेच एमएमआर विभागासह शहरांमधील लोकसंख्येची घनता याचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईसह सात आठ शहरातील करोनाचे प्रमाण हे जवळपास ९७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सुरुवातीपासून करोना रुग्ण व संपर्कातील लोक शोधण्यावर आपण भर दिला. त्यासाठी जास्तीतजास्त चाचण्या कशा होतील याची काळजी घेतली. आज ८८ पेक्षा जास्त करोना चाचणी प्रयोगशाळा राज्यात असून देशात सर्वाधिक प्रयोगशाळा व चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. जवळपास साडेसहा लाख लोकांच्या चाचण्या आपण केल्या असून शासकीय प्रयोगशाळांची चाचण्यांची क्षमता वाढविण्यात येईल” असे सांगून अजोय मेहता म्हणाले, “या चाचण्या करण्यामागे केवळ करोनाचा रुग्ण शोधून उपचार करणे एवढाच उद्देश नाही तर रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोक शोधणे याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. एका रुग्णामागे किमान २० संपर्कातील लोकांना शोधून काढण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.यातूनच रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी तीन पद्धती निश्चित करण्यात आल्या. यात करोनाची लक्षणे नसलेले ( असिम्टमॅटिक), ताप, खोकला आदी लक्षणे असलेले व गंभीर रुग्ण यांना दाखल करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली.”

“होम क्वारंटाइन, संस्थात्मक क्वारंटाइन, रुग्णालयात उपचार तसेच अतिदक्षता विभागात बेडची व्यवस्था करून उपचार अशी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यावर भर दिला. कोमॉब्रीडिटी रुग्णांचे म्हणजे ज्यांना मधुमेह, रक्तदाब, श्वसन विकार व ह्रदय विकारादी त्रास आहे अशा रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला. मृत्यूंची कारणमिमांसा करून प्रभावी उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात आली . एवढेच नव्हे तर या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून जगभरातील उपचार पद्धतीचाही सातत्याने आढावा घेऊन आवश्यक ते उपचारातील बदलही केले गेले. याच्या परिणामी करोना मृत्यूचे प्रमाण ७.८ टक्यांवरून खाली येऊन राज्यात ३.५ तर मुंबईत ३.३ टक्के एवढे झाल्याचे अजोय मेहता यांनी सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण प्लाझ्मा थेरपीला सुरुवात केली असून महाराष्ट्रात १९ ठिकाणी प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरु केली आहेत. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोणत्या ठिकाणी एवढी केंद्र नाहीत, असे सांगून मुख्य सचिव म्हणाले या थेरपीचा निकाल चांगले दिसत आहेत. ”

मुंबईत सुरुवातीला रुग्णालयात खाटा मिळण्यात अडचणी होत्या. मात्र आता संस्थात्मक क्वारंटाईन, रुग्णालयातील खाटांचे प्रमाण वाढविण्याबरोबरच आयसीयूतील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. आयसीयूतील खाटा जास्त असण्याची गरज मान्य करून अजय मेहता म्हणाले, यासाठीच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कोणत्याही परिस्थितीत प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. मुंबईसह राज्यात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे राज्यात सध्या दररोज ३००० ते ३५०० केसेस आढळतात तर मुंबईत हेच प्रमाण १३०० ते १५०० रुग्णांवर स्थिरावले आहे तसेच मृत्यूदरही ३.३ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य यंत्रणेला सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी लोकल ट्रेन सुरु झाली पाहिजे व त्यासाठी सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

मुंबई- पुण्यासारख्या शहरातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित आपल्या गावाकडे गेल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण वाढत असल्याकडे लक्ष वेधले असता, अजोय मेहता म्हणाले, लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक आपल्या गावाकडे जाणार हे व त्यातून करोना पसरू शकतो हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. गावाकडे येणाऱ्या स्थलांतरितांना शाळांत, कार्यालयात तसेच अन्यत्र क्वारंटाईन करण्यात आले. यातून मोठ्या प्रमाणात करोनाला अटकाव करण्यात आला. सरकारला जे जे शक्य आहे ते सर्व आम्ही करोनाला रोखण्यासाठी करत आहोत. मात्र आता शिथिलीकरणानंतर लोकांचीही जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आता अधिक सावध राहाण्याची गरज आहे. तसेच मास्कचा वापर, सॅनिटाइजर चा वापर तसेच सुरक्षित अंतर या तीन शस्त्रांचा प्रभावी वापर केला पाहिजे, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

तथापि एकूणच राज्य व केंद्र आरोग्यावर खर्च करण्यासाठी कायम उदासीन राहिला आहे तसेच आरोग्य खात्यातील रिक्त पदे व केडर निर्माण करण्याचा मुद्दा उपस्थित केला असता अजय मेहता म्हणाले, करोना साथीचा विचार करता भविष्यात कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. यासाठी आरोग्यवार जास्तीतजास्त खर्च करतानाच खर्चाची दिशा निश्चित करावी लागेल. यात ग्रामीण आरोग्य व शहरी आरोग्य असा विचार करून प्राथमिक आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागेल. तीन पद्धतीने आरोग्य यंत्रणा विकसित करताना विचार करावा लागणार आहे. यात पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करताना अचूक आवश्यकता, तंत्रशुद्ध आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थापनाचे निकष व मापदंड निर्माण करावे लागतील, असे अजोय मेहता म्हणाले.

पोलिसांमधील वाढता करोना संसर्ग व मृत्यू ही गंभीर बाब असून पन्नाशी पुढील पोलिसांना थेट करोनाच्या लढाईत उतरण्याला प्रतिबंध घातला आहे. आरोग्य व्यवस्थेतील तसेच करोनाच्या लढाईत आघाडीवर काम करणार्या प्रत्येकाच्या जास्तीतजास्त सुरक्षेची काळजी घेतली जात असून या सर्व योद्ध्यांच्या प्रयत्नातून आणि लोकांनी योग्य सावधानता बाळगली तर करोनाची लढाई निश्चित जिंकू असा विश्वास मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्य साथीच्या आजारांचा विचार करून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. अनेकजण मला विचारतात पुढे काय, यावर एक नक्की सांगेन, लोक कसे वागतात यावरच पुढे काय ते ठरणार आहे.