चार वर्षांच्या आत ४०० दशलक्ष प्रवाशांचा टप्पा पार

मुंबई : शहराच्या पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मेट्रोचा वापर वाढला आहे. घाटकोपर-अंधेरी प्रवास करणाऱ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केला. सुरू झाल्यापासून आजवर ४०० दशलक्षपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत मेट्रोचा हा मार्ग जगात आठव्या क्रमांकावर असल्याचा दावाही कंपनीने केला.

मेट्रो प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ या अर्थिक वर्षांत घाटकोपर ते अंधेरी या दरम्यान ९ लाख २९ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

तर २०१७-१८मध्ये हा आकडा १० लाख ४९ हजारांवर पोहोचला. अंधेरी ते पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी ते आझादनगर आणि अंधेरी ते चकाला या तीन टप्प्यांवर प्रवासी संख्येतली वाढ अनुक्रमे ४८, ४५ आणि २८ टक्के गणली गेली.

सुरू झाल्यापासून ४०० दशलक्ष प्रवासी वाहून नेण्याचा टप्पा मेट्रोने चार वर्षांच्या आत म्हणजे १४२६व्या दिवशी पार केला.

सुरुवातीचे १०० दशलक्ष प्रवासी वाहून नेण्यास ३९८ दिवस लागले. त्यानंतर मात्र ३८८, ३३७ आणि ३०० दिवसांमध्ये पार केला गेला.

यावरून मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हे लक्षात येईल, असे मेट्रो प्रवक्त्याने सांगितले.

‘९९.९९ टक्के वेळापत्रक पाळले’

मेट्रोच्या दर आठवडय़ाला सुमारे ३८२ फे ऱ्या होतात. २०१७-१८मध्ये मेट्रोने एक लाख २५ हजार ८९४ फेऱ्या मारून प्रवाशांची वाहतूक केली. या फेऱ्यांमध्ये मेट्रोने ९९.९९ टक्के वेळापत्रक पाळल्याचा दावाही प्रवक्त्याने केला.