शैलजा तिवले

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या पुढील १५ दिवसांत २२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, सर्वाधिक रुग्णवाढ पुणे आणि नागपूर येथे होण्याचा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या करोना स्थितीवरील अहवालात व्यक्त केला आहे. तसेच एकूण रुग्णसंख्येचा आलेख १२ लाखांवरून १६ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४१० आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुणे, ठाणे, मुंबई आणि नागपूर येथील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, ही संख्या ६ ऑक्टोबपर्यंत ३ लाख ३३ हजार २९६ वर जाण्याची शक्यता आहे. पुण्यात १५ हजार ६६०, तर नागपुरात १२ हजार ७६१ ने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल ठाणे, सांगली येथील रुग्णसंख्येत वाढ होईल. राज्यातील एकूण रुग्णसंख्येत पुढील १५ दिवसांत जवळपास ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.

रुग्णसंख्या वाढल्यास उपलब्ध खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रणा, अतिदक्षता खाटा कोणत्या जिल्ह्य़ात कमी पडतील याचा आढावा आरोग्य विभागाने घेतला आहे. यानुसार, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, भंडारा, वर्धा येथे सर्वसाधारण खाटांची कमतरता भासू शकते. तसेच यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया येथे कृत्रिम श्वसनयंत्रणा, अतिदक्षता खाटांची अधिक आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चंद्रपुरात दुप्पट रुग्णवाढीची शक्यता

चंद्रपूरमध्ये सध्या ४,४०२ उपचाराधीन रुग्णांची नोंद असून एकूण रुग्णसंख्या ८,०९९ आहे. पुढील १५ दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८,०८४ वर जाईल, तर एकूण रुग्णसंख्या १४,९९३ पर्यंत वाढण्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार, चंद्रपूरमध्ये २,०७४ सर्वसाधारण खाटांची कमतरता भासू शकते. तसेच १७४ अतिदक्षता खाटांची आणि १२० कृत्रिम श्वसनयंत्रणांची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुंबईसाठी..

पुणे, नागपूर, ठाण्याच्या तुलनेत मुंबईत मात्र पुढील १५ दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या २७८५ ने वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाने वर्तविले आहे. दरम्यान, राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या जवळपास सव्वा तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असली तरी परिस्थिती नियंत्रणात असेल आणि त्या दृष्टीने उपाययोजना सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.