हा सारस्वतांचा एक आवडता पदार्थ आहे. पण ही थालीपिठे नव्हेत. हे पोळेच. थालीपिठे थापायची असतात तर पोळे हे पिठ तव्यावर ओतून करायचे असतात. गंमत सांगायची तर हे पोळे म्हणजे डोसा आणि घावनाचा मावसभाऊच म्हणा ना! याचे वैशिष्टय़ म्हणजे यात कोणतीही पिठे घालू शकता, कोणत्याही भाज्या घालू शकता.

साहित्य

कणीक एक वाटी, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ ही पिठे जशी हवीत तशी एक एक वाटी, आवडत असल्यास अर्धी वाटी बेसनही घेऊ शकता. हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीर जाडसर वाटून घ्या. अधिक तिखटपणासाठी वरून लाल तिखटही घालता येईल. चाट मसाला, जिरेपूड, हळद, किंचित साखर, मीठ.

कृती

सर्व पिठे एकत्र करून सरसरीत भिजवावीत. ही पिठे ओतता आली पाहिजेत, एवढी सरसरीत असावीत. पॅन चांगले चरचरीत गरम करून तेलावर डावभर पीठ ओतून पसरवावे. छानपैकी झाकण ठेवावे. मंद आगीवर लालसर होईपर्यंत तेल सोडून दोन्ही बाजूने शेकवावे. यामध्ये आवडत असल्यास किसलेला कोबी, गाजर, मेथी, पालक काहीही घालता येईल. पण असे काही घातल्यानंतर थोडे जास्त वेळ भिजवावे आणि मगच करायला घ्यावीत. हे पोळे झटपट तयार होतात. गार झाले तरीही वातड होत नाहीत. मऊ राहतात. डब्याला न्यायलाही छान आणि नाश्ता म्हणूनही झक्कास लागतात. कधी अगदीच कंटाळा आला तर जेवणाऐवजीही हे पोळे खाऊ शकता. सोबत एखादी कोशिंबीर, दही वगैरे घेतलेत की तुमचे पूर्णब्रह्म तयार!

(लेखिका खाद्यसंस्कृती व पाककलेच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)