मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का लागू नये व या समाजाची बाजूही न्यायालयात मांडण्यात यावी, अशी मागणी इतर मागासवर्गीय मंत्र्यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.

इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षण प्रश्नावरूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येत्या २५ जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समावेश करून लाभ देण्याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावरून छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आदी ओबीसी मंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे मंत्रिमंडळाचे लक्ष वेधताना ओबसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू मांडण्यासाठी विशेष वकील नियुक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्यावर सोमवारी सर्व संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर  विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील  समिती सखोल चौकशी करीत असून या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे, ही समिती येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती प्रदीप व्यास यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. तर आगीच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना  जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अर्थ व ऊर्जा खाते पुन्हा आमने-सामने

वीजदरातील सवलतीसह मोफत वीज आणि इतर प्रश्नांनंतर नितीन राऊत यांचा ऊर्जा विभाग आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा अर्थ विभाग पुन्हा आमनेसामने आले आहेत. ऊर्जा जीएसटीचा बोजा हे नव्या मतभेदांचे कारण ठरले आहे. निधी द्यावा अशी नितीन राऊत यांची अपेक्षा आहे. मात्र ती सरसकट मान्य करण्यास अजित पवार यांच्या अर्थ विभागाने नकार दिला.त्यामुळे नितीन राऊत काहीसे नाराज झाले असे समजते.

भंडारा आगीचा अहवाल रविवारी

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आगीच्या घटनेनंतर सर्व जिल्हय़ांतील शासकीय रुग्णालयांची ठरावीक कालावधीत सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. तर भंडारा आगप्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा अहवाल येत्या रविवारी येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिली.