परिवहन खात्याच्या नव्या योजनांचे नामकरण वादात; नावातील धर्म आणि पक्षाच्या उल्लेखास विरोध
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून त्यांच्या नावाने सहा योजनांची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली. मात्र एसटी व परिवहन विभागातर्फे सुरू करण्यात येत असलेल्या या योजनांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख’ असा करण्यात आला असून, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी योजनांमध्ये धर्म आणि राजकीय पक्षांचा उल्लेख करणे हा केवळ संकेतांचाच भंग नव्हे, तर भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरोधातही असल्याचा आक्षेप राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून घेण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची घोषणा होऊनही अद्याप त्यासंदर्भात पुढे काहीच झालेले नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याबाबत दिलेल्या पत्रावर ‘नियमानुसार कार्यवाही करावी’ असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर रावते यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने एसटी व परिवहन विभागातर्फे सहा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र योजनांच्या नावामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात येणार आहे.
कायद्यामध्ये याबाबत कोणतीही ठोस तरतूद नाही. त्यामुळे त्यातून कायदेभंग होत नसला, तरी मान्य संकेतांचे मात्र उल्लंघन होते, असे मत एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केले. काँग्रेसनेही या बाबीस आक्षेप घेतला असून, त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. त्यांच्या नावाने योजना जाहीर करण्यासही विरोध नाही. मात्र सरकारी योजनांच्या नावामध्ये धर्म आणि राजकीय पक्षाचा उल्लेख करणे अयोग्य आहे. तर हा पायंडा अयोग्य असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांनी व्यक्त केले.

सरकारी योजनांच्या नावामध्ये धर्म आणि राजकीय पक्षाचा उल्लेख करणे अयोग्य आहे, एवढेच नव्हे, तर ते घटनाबाह्य़ही आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास त्याविरोधात न्यायालयात जावे लागेल.
– सचिन सावंत, काँग्रेस</strong>