नेरुळ उड्डाणपूल अपघात प्रकरण

नेरुळ येथील उड्डाणपुलावरील अपघातप्रकरणी अटकेत असलेल्या सायन-पनवेल टोलवेज (एसपीटीपीएल) कंपनीच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रत्येकी एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला. या अधिकाऱ्यांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता भासत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कंपनीचे उपाध्यक्ष पवनितसिंग सेठी, विभुदत्त सतपती, वरिष्ठ व्यवस्थापक आणि प्रकल्प प्रमुख रमझान अब्दुल्ला पटेल तसेच अंमलबजावणी आणि देखभाल व्यवस्थापक संजीत श्रीवास्तव या बडय़ा अधिकाऱ्यांसह ट्रकचालक संतोष राजपूत याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुरुवातीला केवळ ट्रकचालकाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे सामान्यांसाठी एक आणि अधिकारी-कंत्राटदारांसाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर पटेल आणि श्रीवास्तव यांना गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली.

या दोघांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी हा अपघात बेदरकारपणे गाडी चालवल्याने झाला असून त्यात कंपनीचा काहीही दोष नाही, असा दावा पटेल आणि श्रीवास्तव यांच्या वतीने करण्यात आला. शिवाय ६ जून रोजी कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला होता व महामार्गाची देखभालीची जबाबदारी यापुढे विभागाची असल्याचे कळवले होते, असेही दोघांच्या वकिलांनी न्यायालयाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला.