कुल्र्याहून उद्या सीएसटीसाठी शेवटची गाडी; खास डब्यांचे तिकीट दहा हजार
गेली ९१ वर्षे मुंबईच्या जीवनवाहिनीला ऊर्जा पुरवणारी डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल गाडी येत्या रविवारपासून काळाच्या पडद्याआड जाणार आहे. मध्य रेल्वेने डीसी लोकलची ही शेवटची धाव साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने तीन डबे राखीव ठेवले आहेत. या डब्यांमध्ये प्रत्येक आसनाला क्रमांक देऊन प्रत्येक आसनाचे तिकीट दहा हजार रुपयांना विकण्यात येणार आहे. डीसी लोकलच्या शेवटच्या फेरीसाठी मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तीही या डब्यातून प्रवास करणार आहेत.
गाडीचे जतन..
या गाडीचे डबे ठाणे, वाडीबंदर, पी डिमेलो मार्ग आणि दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय येथे स्मारक म्हणून ठेवण्यात येतील. दहा हजार रुपये भरून प्रवास केलेल्या प्रवाशांना जे. जे. कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आपला पुतळा बनवून घेता येणार आहे. हा पुतळा या डब्यांसह त्यातच जतन करण्याची संकल्पनाही रेल्वेने आणली आहे. मात्र त्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

कुर्ला ते मुंबई</strong>
* फेब्रुवारी १९२५ रोजी डीसी विद्युतप्रवाहावरील पहिली गाडी मुंबई ते कुर्ला या मार्गावर धावली होती
* आता डीसी विद्युतप्रवाहावरील शेवटची गाडी ९ एप्रिलला रात्री ११.३० वाजता कुर्ला येथून मुंबईकडे निघणार आहे.
* ही अखेरची गाडीही मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ४० वर्षे जुनी गाडी असेल.
* ‘दसहजारीं’साठी खास व्यवस्था..
* या गाडीतील तीन डब्यांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. या डब्यातील प्रत्येक आसनाचे तिकीट दहा हजार रुपये असेल.
* या ‘दसहजारी मनसबदारां’ना मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे खास स्टार दालनात नेण्यात येईल.
* या दालनात त्यांना डीसी-एसी परिवर्तनाचे काम व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे थेट पाहता येणार आहे.