सुशांतच्या जिवाला धोका आहे हे फेब्रुवारी महिन्यातच पोलिसांना सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही असा दावा सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी केला आहे. १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. मी त्यांना सुशांतच्या आत्महत्येनंतरही सांगितले की २५ फेब्रुवारीच्या तक्रारीत ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मात्र वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी काहीही केलं नाही, त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर मी पाटणा या ठिकाणी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचं वक्तव्य सुशांतच्या वडिलांनी केलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आज हे वक्तव्य एक स्टेटमेंटच्या रुपाने लागू केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी २५ फेब्रुवारी रोजीच दिली होती. मात्र वांद्रे पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच एएनआयलाही यासंदर्भातलं वक्तव्य त्यांनी दिलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यानंतर संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी हादरली होती. मात्र सिनेसृष्टीतल्या काही लोकांनी सुशांतचा बळी हा घराणेशाही आणि गटबाजीमुळे झाला आहे असा आरोप केला. यासंदर्भातल्या काही बातम्या प्रसारमाध्यमांनी चालवल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहखात्याने हा अँगलही तपासण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आपल्या तक्रारीकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं आपण पाटणा येथे तक्रार दाखल केली असंही आता सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे.