मुंबई : तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणार नसून हे प्रवेश दहावीच्या गुणांआधारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रनिकेतनातील (आयटीआय) प्रवेशही दहावीच्या गुणांआधारे करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर पुढील सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे, याबाबत प्रश्न निर्माण झाले. अकरावीच्या प्रवेशासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. मात्र प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार असल्याने प्रवेशाच्या स्पर्धेत टिकून राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र पॉलिटेक्निक प्रवेशोत्सुकांना प्रवेश परीक्षेपासून दिलासा मिळणार आहे. आयटीआयचे प्रवेशही दहावीच्या गुणांआधारे दिले जाणार आहेत.

‘पॉलिटेक्निकचे प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या आधारेच दिले जातील. निकाल जाहीर झाला की पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमांची माहिती पोहोचवण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून स्वतंत्र मोहीम राबवण्यात येते. त्याअंतर्गत यंदा पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सीईटीसाठी नोंदणी सुरू

विविध व्यावसायिक विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठीची (सीईटी) नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली असून ७ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज भरू शकतील. सीईटीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज प्रवेश नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.