जग विकासाच्या वाटेवर चालले असले, तरी या जगाला जोडणारा साधा रस्तादेखील गावात नसल्याने विकासाचे वारे गावाकडे पोहोचतच नाहीत, हे आजही महाराष्ट्राच्या अनेक गावांचे वास्तव आहे. अशी अनेक गावे मदतीच्या आशेने मायबाप सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेली असतात. विदर्भातील मढी नावाच्या अडीचशे वस्तीच्या एका छोटय़ाशा गावाने मात्र, सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वावलंबनातून विकास साधण्याचे ठरविले आहे.
रस्ता हा गावाच्या स्वावलंबनाचा पहिला मार्ग हे ओळखून श्रमदानातून रस्ता व नदीवरील पूल बांधणीचे काम दूर विदर्भातील मढी गावच्या ग्रामस्थांनी हाती घेतले आणि या स्वावलंबनाच्या आगळ्या उपक्रमाच्या मदतीसाठी मुंबईकरांचे हजारो हात सरसावले.. ग्रामविकासाचा ध्यास घेऊन नासामधील नोकरी सोडून ग्रामीण महाराष्ट्रात रमणाऱ्या बाळासाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मढीचा स्वावलंबनाचा अध्याय सुरू झाला आहे.
गावच्या रस्त्यासाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नांची मुहूर्तमेढ मुंबईत रोवली जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, ३१ मार्च रोजी मुंबईत ‘दास्तां एक जबाबकी’ या नाटकाचा प्रयोग होत आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील मढी हे एका टोकावरचे जेमतेम २५० लोकसंख्येचे गाव. म्हणूनच उपेक्षित. गावाला जोडणारा रस्ताच नसल्याने बाहेरच्या जगाशी संपर्क क्वचितच. अमेरिकेत ‘नासा’ या सुप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेत काम केल्यानंतर ग्रामविकासाच्या ध्येयाने भारतात परतलेले बाळासाहेब दराडे यांनी मढी गावच्या रस्त्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेत कंबर कसली आहे. मुख्य पक्का रस्ता बांधून होईपर्यंत पावसाळय़ात नदीपल्याड जाता यावे यासाठी पूल बांधण्याचे काम महाशिवरात्रीला हाती घेण्यात आले. काही मुंबईकर मंडळींनी याकामी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि निधीची गरज जास्त असल्याने तो उभा करण्यासाठी नाटय़प्रयोगाचा मार्ग निवडला. स्वावलंबनासाठी आपल्याच श्रमातून रस्ता बांधण्यास सरसावलेल्या या मढीवासीयांच्या मदतीसाठी मतिमंद मुलांच्या समस्येवर आधारित ‘दास्तां एक जबाबकी’ हा नाटय़प्रयोग रविवार, ३१ मार्च दादरच्या शिवाजी मंदिरात सकाळी ११ वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी ९३२१८१९५८२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.