मुंबई : वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका इमारतीची भिंत दुसऱ्या घरावर पडल्यामुळे भिंतीखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.

पावसाला अजून सुरुवातही झालेली नसताना मुंबईत पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. वांद्रे पूर्वेकडील रज्जक चाळीवर रात्री पावणेदोनच्या सुमारास शेजारील चार मजली इमारतीची भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक लोक गाडले गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून ११ जणांना सुखरूप बाहेर काढले. तर अग्निशमन दल पोहोचण्याआधी सहा जणांना आजूबाजूच्या रहिवाशांनी वाचवले. सर्व जखमींना वांद्रे भाभा व अंधेरीच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात वांद्रे भाभा येथे दाखल करण्यात आलेल्यांपैकी रियाज अहमद हा २८ वर्षांचा तरुण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाला होता. तर अन्य जखमींमध्ये पाच पुरुषांचा समावेश असून त्यापैकी चार जण हे २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.