मुंबई : संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे साकीनाका येथे घराची भिंत कोसळून एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. साकिनाका, चांदीवली येथे म्हाडाच्या इमारतीच्या समोरील एका घराची भिंत शुक्रवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तिघे जखमी झाले होते. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेले चंद्रकांत मुन्नप्पा शेट्टी (४०) यांचा मृत्यू झाला, तर संदीप सुरेश कदम (३५) व मौला मकतुम चौधरी (३५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत दोन दिवसांत अनेक ठिकाणी पडझड झाली. पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे घराचा भाग, भिंत कोसळल्याच्या आठ तक्रारींची नोंद झाली.  प्रभादेवी येथे किस्मत सिनेमा समोरील भगवानदास चाळीची संरक्षक भिंत शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्या होत्या. परंतु स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढले.

तिसऱ्या दुर्घटना वरळी गावात घडली. तेथील वारस लेन येथे मुक्ताबाई चाळ या उपकर प्राप्त इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. त्याबाबत दादर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.