केईएम रुग्णालयातील दुर्घटनेबाबत महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय :- केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या तीन महिन्याच्या मुलाला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जातील, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जातील. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्यामुळे मृत पावलेल्या राजेश मारू यांच्या नातेवाईकांनाही दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या प्रिन्स राजभर या अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला हात गमवावा लागला. ७ नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली. या गंभीर प्रकाराचे नुकत्याच झालेल्या महासभेत पडसाद उमटले होते. प्रिन्सला दहा लाखांची मदत द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती.  तसेच जानेवारी २०१८ मध्ये लालबाग येथील राजेश मारू यांचा नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचल्यामुळे मृत्यू ओढवला होता. त्यांच्या नातेवाईकांनाही दहा लाख रुपये देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत कुठेही मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना किंवा जखमी होणाऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी ठोस धोरण तयार करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली. गटनेता बैठकीला पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि पालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित होते.

‘सीईओं’च्या नेमणुकीची प्रक्रिया जलद गतीने

पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांवर रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यास नगरसेवकांनी विरोध केला होता. साहाय्यक आयुक्तांवर ही अतिरिक्त जबाबदारी टाकल्यास त्यांच्यावर कामाचा ताण वाढून वॉर्डमधील कामावर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे गटनेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे लवकरच सीईओंची नेमणूक करण्यात येईल, तसेच निवृत्त अधिष्ठाता किंवा उपअधिष्ठात्यांची या पदावर नियुक्ती करण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अल्प दरात औषधे

दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या धर्तीवर वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. पालिका रुग्णालयात अमृत औषधालय (फार्मसी) सुरू करण्यात येणार असून यामध्ये रुग्णांना ४० टक्के कमी दराने  औषधे दिली जातील, असाही निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. हे औषधांचे दुकान रुग्णालय आवारातच उभारण्यात येणार आहे.