पुणे येथे गेल्या १ ऑगस्ट रोजी साखळी बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी आणखी एकाला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. या आरोपीला सोमवारी विशेष ‘मोक्का’ न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बंटी जहांगीरधर (४०) असे आरोपीचे नाव असून तो अहमदनगर येथील रहिवाशी आहे. त्याला त्याच्या नगर येथील घरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याचाही पुणे स्फोटात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला रविवारी अटक करण्यात आली. स्फोटाच्या कटासाठी शस्त्रास्त्रे पुरविण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याचे एटीएसतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.
यापूर्वी याप्रकरणी ‘एटीएस’ने इंडियन मुजाहिदीनच्या फिरोज सय्यद, इरफान लांडगे, इमरान खान, असद खान, सय्यद आरिफ ऊर्फ काशीफ बियाबनी, मुनीब इक्बाल मेमन आणि फारूख बागवान अशा सातजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गेल्या १ ऑगस्ट रोजी जंगली महाराज मार्गावरील बालगंधर्व सभागृह, देना बँक शाखा, मॅक्डोनल्ड, आणि गरवारे पूल अशा चार ठिकाणी कमी तीव्रतेचे चार साखळी बॉम्बस्फोट घडवून पुण्याला पुन्हा एकदा हादरवले होते. या स्फोटांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला होता.