बीजगणित आणि पायथागोरसचा सिद्धांत सर्वप्रथम भारतानेच मांडल्याच्या केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन यांच्या दाव्यानंतर रविवारीही भारतीय विज्ञान परिषदेत (इंडियन सायन्स काँग्रेस) प्राचीन काळातील भारतीय संशोधकांची कामगिरीच केंद्रस्थानी राहिली. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या किती तरी आधी भारतीयांनी हे तंत्र विकसित केले होते, असा दावा करण्यात आला. त्यामुळे, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातील आव्हाने, संशोधन या विषयीच्या साधकबाधक चर्चेऐवजी ही परिषद विज्ञानाची ‘पाळेमुळे’ शोधण्याच्या या प्रकारामुळेच अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत सुरू असलेल्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी केंद्रीयमंत्री हर्ष वर्धन यांनी ‘प्राचीन काळातील भारतीयांनी आपल्या संशोधनाचे श्रेय अन्य देशांच्या शास्त्रज्ञांना घेऊ दिले,’ असा दावा केला होता. त्यावरून चर्चा सुरू असतानाच, रविवारी विज्ञान परिषदेत ‘संस्कृतमधील प्राचीन विज्ञान’ असा परिसंवादच भरला. त्यात वक्ते म्हणून सहभागी झालेले ‘पायलट ट्रेनिंग सेंटर’चे निवृत्त प्राचार्य कॅप्टन आनंद बोडस यांनी प्राचीन गं्रथांचे दाखले देत प्राचीन काळातही भारतात विमाने उडत होती, असा दावा केला. भारतात सात हजार वर्षांपूर्वी विमान अस्तित्वात होते. इतकेच नव्हे तर आताच्या विमानांपेक्षा किती तरी ‘अ‍ॅडव्हान्स’ आणि जंबो आकाराची असलेली ही विमाने उलटसुलट पद्धतीने उडण्याच्या करामतीही करू शकत होती, असे ते म्हणाले.
बोडस यांच्या ‘प्राचीन भारतीय हवाई उड्डाण तंत्रज्ञान’ या विषयाला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याने तो या विज्ञानविषयक परिषदेत समाविष्ट करण्यावरच नासामधील एका भारतीय संशोधकाने आक्षेप घेतला होता. अर्थात महर्षी भारद्वाज लिखित वेदकालीन संहितेचा आधार वगळता आपल्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही भौतिक स्वरूपाचा पुरावा बोडस आणि त्यांच्या या विषयाच्या अभ्यासात सहकारी असलेल्या अमेया जाधव यांच्याकडे नाही. ‘स्युडो सायन्स’ प्रकारातला हा विषय त्यामुळे रद्द करण्यात यावा, असे या संशोधकाचे म्हणणे होते. बोडस यांच्या सादरीकरणानंतर नेमके याचेच प्रत्यंतर आले.

इतर वक्त्यांकडूनही भलामण
केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांनीही प्राचीन भारती विज्ञानातील संज्ञा या तर्कशास्त्रावर आधारलेल्या होत्या, असे म्हटले. आपल्या संस्कृतमधील साहित्याच्या आणि प्राचीन विज्ञानाच्या आधारे जर्मन अत्याधुनिक साधने तयार करू शकतात, तर आपण का नाही, असा सवाल त्यांनी केला. या परिषदेतील विषयही दर्जेदार असून संपूर्णत: धर्मनिरपेक्ष आणि शैक्षणिक आहेत, असा दावा त्यांनी केला. विज्ञान भारतीचे संस्थापक विजय भटकर यांनीही ‘प्राचीन भारतीय विज्ञान हा विषय समाविष्ट करण्यास १०० वर्षे का लागली. हा विषय आधीच परिषदेत समाविष्ट व्हायला हवा होता,’ असे मत मांडले.

‘विज्ञाननिष्ठ बना’
धार्मिक होण्याऐवजी विज्ञानवादी बना. नैतिकता धर्मामधून येते पण, तिला केवळ वैज्ञानिक आधार असला तरच तिचा स्वीकार करा, अशा शब्दांत विज्ञाननिष्ठ बनण्याचा सल्ला नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी मुंबईत ‘चिल्ड्रेन सायन्स काँग्रेस’मध्ये दिला.

‘दर्जेदार नेतृत्वाची गरज’
देशाच्या विकासासाठी दर्जेदार नेतृत्त्वाची गरज असून त्या नेतृत्त्वाकडे दिशा असणे आवश्यक असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. नेतृत्त्वाकडे जिद्द, यशापयशाचे व्यवस्थापन आदी गुण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.