दुसऱ्या डॉप्लरच्या पर्यायावर चर्चा
सी बॅण्ड रडारसाठी जागेचा शोध सुरू..
डॉप्लरला अडथळा ठरू शकणाऱ्या दक्षिण मुंबईतील ८० मीटरहून अधिक उंच इमारतींना बंदी घालण्याऐवजी दुसऱ्या डॉप्लरच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव व हवामानशास्त्र विभागाच्या दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या बठकीत दुसऱ्या डॉप्लरचा पर्याय, त्यासाठी जागा तसेच खर्च याबाबत चर्चा करण्यात आली.
कुलाबा परिसरात अर्चना इमारतीवर सध्या लावण्यात आलेले रडार तेथून हलवणे शक्य नसल्याचे केंद्रीय वेधशाळेतील रडार शाखेचे प्रमुख सतीश भाटिया यांनी मुख्य सचिव जयंत बांटिया यांना स्पष्ट केले. या बठकीला महानगरपालिका अधिकारी तसेच मुंबई हवामानशास्त्र विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. या बठकीत दुसऱ्या रडारच्या पर्यायाचा विचार करण्यात आला. जगभरातील विकसित शहरात रडारचे जाळे उभारण्यात आल्याचे व तसा पर्याय शक्य असल्याची माहिती लोकसत्ताने यापूर्वी दिली होती.
सध्या एस बॅण्ड रडार लावण्यात आली असून त्यापेक्षा कमी परीक्षेत्र असलेल्या सी बॅण्ड रडारचा पर्याय वेधशाळा अधिकाऱ्यांनी या बठकीत सांगितला. एस बॅण्ड रडारमुळे ३०० किलोमीटर परिसरातील घटकांचा अभ्यास करता येतो तर सी बॅण्ड रडारमधून २५० किमी परिसरातील अभ्यास करता येईल. सी बॅण्ड रडारची किंमत २५ कोटी रुपये असून ते बसवण्यासाठी आवश्यक असलेले दोन ते तीन मजल्यांचे बांधकाम, यंत्रजोडणी, वीजपुरवठा, नेटवìकग यासाठी अतिरिक्त दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महानगरपालिका, राज्य सरकार, वेधशाळा किंवा इतर कोण करणार याबाबत चर्चा झालेली नाही.
रडारसाठी जागा शोधणे हा जिकिरीचा मुद्दा आहे. सध्याच्या रडारसाठी दोन वष्रे जागा शोधावी लागली होती. चारही दिशांनी अधिकाधिक क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नसलेली उंच जागा तसेच २४ तास वीजपुरवठा रडारसाठी आवश्यक ठरतो.
रडारचा निर्णय झाला तरी ते तातडीने बसविणे शक्य नाही. त्यासाठी जागा पाहावी लागेल. रडारसाठी जागतिक निविदा काढाव्या लागतील. रडार आल्यावर ती बसवण्यासाठी बांधकाम करावे लागेल, रडारसाठी वेगळी टीम तयार करावी लागेल, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले.
रडार हलवणे अशक्य का?डॉप्लर रडारचा केवळ घुमट बाहेरून दिसत असला तरी रडार म्हणजे शंभरहून अधिक यंत्रांचा समुच्चय असतो. विविध प्रकारची नोंदणी घेण्यासाठी या यंत्रांचा एकमेकांसोबत ताळमेळ आवश्यक असतो.
ही सर्व यंत्रे काढून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन एकत्र बसवणे हे अत्यंत किचकट, वेळखाऊ व कठीण काम आहे. या यंत्रांचा ताळमेळ नीट जुळला नाही तर माहिती घेताना अडचणी येतील. २० टन म्हणजे २०हजार किलो वजनाची तसेच १५ मीटर व्यास आकाराचा घुमट पेलू शकणारी इमारत तसेच रडार बसवण्यासाठी विशिष्ट बांधकाम आवश्यक ठरते.