राज्यभर आज-उद्या विशेष मोहीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असूनही राज्यातील एकतृतीयांश तरुणाई आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी (२ आणि ३ मार्च) राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

विशेष मतदार नोंदणी मोहिमेची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही काळापासून मतदार नोंदणीसाठी सातत्याने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यात २३ आणि २४ फेब्रुवारीलाही मोहीम राबवण्यात आली. त्यात दोन लाख ५३ हजार २४६ नवीन मतदारांची नोंदणी झाली. नाव नोंदणीचा अर्ज दिल्यानंतर साधारणपणे ११ दिवसांत पडताळणी होऊन नाव यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या शिबिरात मतदारांनी नाव नोंदणीसाठी, यादीतील नाव-तपशिलातील बदलांसाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

राज्यात १८ ते १९ वयोगटातील नवीन मतदारांचे नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. लोकसंख्येत या वयोगटातील तरुण-तरुणींचे जे प्रमाण आहे त्यापेक्षा सुमारे ३३ टक्के कमी नावे मतदार यादीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांमार्फत प्रयत्न सुरू केले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

मतदार नोंदणीसाठी शनिवारी-रविवारी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेनुसार नागरिकांनी आपल्या भागातील मतदान केंद्रात जावे. नाव नोंदणी-तपशिलातील बदल, नाव वगळणे यासाठीचे अर्ज तेथे उपलब्ध असतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.