नाशिक जिल्ह्य़ातून होणारी आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना कृषीमालाचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत शनिवारी कांद्याचे दर किलोमागे ३० रुपयांपर्यत खाली उतरले आहेत. उत्तम प्रतीचा सुकलेला कांदा अजूनही ३५ रुपयांनी विकला जात असला तरी गेल्या १० दिवसांत कांद्याचे घाऊक दर तब्बल ३० रुपयांनी खाली उतरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठय़ा प्रमाणावर घसरण सुरू असली तरी किरकोळ बाजारात सुका कांदा अजूनही पन्नाशीच्या आसपास आहे.
जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. नाशिक जिल्ह्य़ातून मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना होणारी कांद्याची आवक कमालीची घटल्यामुळे हे चित्र निर्माण झाले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारपेठेत १०० ते १२० गाडी आवक झाल्यास कांद्याचे दर स्थिर राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला दररोज सरासरी १०० गाडी कांदा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून जेमतेम ६० ते ७० गाडी कांदा या बाजारात येत होता. त्यामुळे कांद्याचे घाऊक दर ६५ रुपयांपर्यत पोहोचले होते. किरकोळ बाजारातही उत्तम प्रतीचा कांदा ७० ते ८० रुपयांनी विकला जात होता. गेल्या १० दिवसांपासून परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर बदल झाला असून एपीएमसी बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ३० रुपयांनी मिळू लागला आहे. गेल्या सोमवारपर्यत हाच कांदा ४० ते ४५ रुपयांनी विकला जात होता, अशी माहिती बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिली. शुक्रवारी या बाजारात सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वाधिक आवक होती, असेही सांगण्यात आले. कांद्यापाठोपाठ बटाटय़ाचे दरही खाली उतरू लागले असून काल-परवापर्यंत २१ रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या बटाटय़ाचे दर शुक्रवार, शनिवारी १५ रुपयांपर्यंत खाली उतरले होते.
दरम्यान, राजस्थान तसेच इतर राज्यांतून आयात होणाऱ्या लसणाचे दर मात्र चढेच असून शनिवारी ते ९० रुपये किलोपर्यत पोहोचले. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहील, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. किरकोळ बाजारात लसणाच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला असला तरी कांद्याचे दर घसरत असल्याचा दिलासा ग्राहकांना कायम आहे. अजूनही बाजारात लहान आणि काहीसे ओलसर कांदे विक्रीला येत असल्याची ओरड असली तरी येत्या पंधरवडय़ात ही परिस्थिती बदलेल, असा दावा एपीएमसीतील सूत्रांनी केला.