कधी तरी अचानक आपल्याला गावातल्या गावात एखाद्या मोठय़ा वस्तूची ने-आण करण्याची गरज भासते. मग आपण छोटय़ा टेम्पोच्या (टेम्पोचालकांच्या भाषेत छोटा हत्ती) शोधात बाहेर पडतो. अनेकांना विचारतो छोटा टेम्पो कुठे मिळेल? मग आपल्याला एका टेम्पो नाक्याचा पत्ता मिळतो. तिथे गेल्यावर त्या टेम्पोवाल्याशी चर्चा करताना आपल्याला अनेक वस्तूंची माहिती देण्यापासून ती उचलणार कोण इथपर्यंतचा तपशील द्यावा लागतो. मग पैशांसाठीही वाद घालावा लागतो. इतके करूनही जर चालकाला जेवायला जायचे असेल किंवा अन्य काही करायचे असेल तर तो अध्र्या ते एक तासाने येतो अशी बतावणी करतो. अशी एक ना अनेक आव्हाने पेलत अखेर तो टेम्पो आपल्या दारात येतो. पण आता जर आपल्याला कधी छोटय़ा टेम्पोची गरज भासली तर मोबाइलच्या एका क्लिकवर ते शक्य होणार आहे.

व्यवसायांच्या किंवा समाजातील विविध गरजांवर उत्तर शोधणे हे आयआयटियन्सच्या जनुकावलीतच असते असे म्हटले जाते. यामुळेच आयआयटी खरगपूर येथून पदवीधर झालेल्या प्रणव गोएलने आपल्या वडिलांच्या ट्रकच्या व्यवसायातील नानाविध अडचणींवर काही डिजिटल उत्तर मिळू शकेल का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही संकल्पना अधिक विकसित करण्यासाठी त्याने त्याच्यासोबत शिकलेल्या उत्तम डिग्गा याची मदत घेतली. या दोघांनी शहरांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोसाठी आणि अशा टेम्पोची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आले की, आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील १३ ते १४ टक्के वाटा हा मालवाहतुकीचा आहे. हाच वाटा परदेशात सात ते आठ टक्के इतका आहे. या व्यवसायावर देशातील बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. पण इतरांच्या तुलनेत ही मालवाहतूक करणारा वर्ग फारच दुलक्र्षित आहे. याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असेल किंवा या लोकांमध्ये असलेला अव्यावसायिकपणा असेल पण हा वर्ग अनेक सुविधांपासून वंचित आहे. शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या छोट हत्तीच्या चालकांना दिवसाला एक ते दोनच भाडी मिळतात. त्याचे पैसेही पूर्ण मिळतातच असे नाही. अनेकदा दुकानदार त्यांच्याशी बांधलेले असतात आणि त्यांना दरमाह पैसे देतात. ते पैसे देताना अमुक दिवशी तू उशिरा आलास, सामानाचे नुकसान झाले आदी कारणे देत पैसे कापतात व त्यांचे नुकसान करतात. यामुळे चालकांना पूर्ण पैसे मिळतातच असे नाही. तर दुकानदारांनाही टेम्पोचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते यामुळे एका तासात होणारे काम दोन तासांमध्ये होते आणि आर्थिक नुकसान सोसावे लागते. या व्यवसायातील अशा अनेक समस्या आमच्या समोर आल्याचे प्रणवने सांगितले. या सर्वावर उत्तर म्हणून एक अ‍ॅप काढण्याचा निर्णय घेतला आणि तांत्रिक बाबतीत आयआयटी कानपूरमधील विकास चौधरी याची मदत घेतली. अशा प्रकारे छोटा हत्तीला ऑनलाइन क्षेत्रात आणणाऱ्या ‘पोर्टर’ या अ‍ॅपचा जन्म झाला.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?

ज्याप्रमाणे आपण अ‍ॅपआधारित टॅक्सीची मागणी नोंदवतो त्याप्रमाणेच या अ‍ॅपच्या मदतीने छोटा हत्तीची मागणी नोंदविता येऊ शकते. या अ‍ॅपच्या आधारे मागणी नोंदविण्यासाठी ग्राहकांना आणि टेम्पोचालाक आणि मालकांना कंपनीत नोंदणी करावी लागते. ही नोंदणी करत असताना टेम्पोची सर्व कागपत्रे तपासून घेतली जातात. हे सर्व झाल्यानंतर नोंदणी पूर्ण होते. त्यानंतर चालकांना कंपनीत एक प्रकाचे प्रशिक्षण दिले जाते. चालकांना अ‍ॅप वापरणे सोपे जावे यासाठी ते मराठीसह अन्य प्रांतिक भाषांमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहकाने मागणी नोंदविण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून लोकेशन सुरू करून वस्तू कोठे न्यायची आहे याचा तपशील द्यावा. हा तपशील दिल्यावर त्या परिसरात असलेला छोटा हत्ती अवघ्या १५ मिनिटांच्या अवधीत तुमच्या दारात येऊन उभा राहत असल्याचे प्रणवने सांगितले. यामुळे ग्राहकाची आपण सांगितलेला टेम्पो वेळेत येणार की नाही याची काळजी दूर झाली. इतकेच नव्हे तर सर्व टेम्पो कंपनीशी जीपीएसद्वारे जोडले गेले असल्यामुळे आमच्याकडे टेम्पो कुठे आहे याचा तपशील सतत समोर येत असतो. ग्राहकांना आणि टेम्पोचालकांना या अ‍ॅपबाबत माहिती देण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या भेटी घेऊन त्याचे फायदे समाजवून सांगतो. मुंबईत पाच ग्राहक आणि एक टेम्पो यांच्या बळावर उद्योगला सुरुवात केली आणि दीड वर्षांच्या अवधीत मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि चेन्नई या पाच शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध असून कंपनीकडे २५ हजार ग्राहक आणि पाच हजार टेम्पोचालक नोंदणीकृत झाले आहेत. या अ‍ॅपची सेवा घेतल्यामुळे टेम्पोचालकांच्या उत्पानात ७० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण यापूर्वी एखादी वस्तू घेऊन टेम्पो अमुक एका परिसरात गेला तर त्या परिसरात टेम्पोची मागणी आहे का हे त्याला कळत नसे. ते या अ‍ॅपच्या माध्यमातून कळू लागले आहे यामुळे येताना पूर्वी रिकामा येणारा टेम्पो आता ८० टक्के वेळा भरूनच येतो असेही प्रणव सांगतो. याचबरोबर सुरुवातीला खर्च वगळता ८०० रुपये कमाविणारा चालक आता १२०० रुपये कमावू लागला आहे. तर ग्राहकाच्या खर्चातही २५ टक्के कपात झाली आहे. या अ‍ॅपद्वारे नोंदणी केलेल्या टेम्पोसाठी पहिल्या दोन किमीसाठी २०० रुपये आकारले जातात त्यानंतर प्रत्येक किमीसाठी १८ रुपये आणि एका मिनिटासाठी दोन रुपये आकारले जातात. यामुळे संपूर्ण प्रवासाची रक्कम सध्या टेम्पोचालक आकारत असलेल्या दरापेक्षा कमी होते असे प्रणवने सांगितले.

गुंतवणूक उत्पन्नस्रोत

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला स्वत:च्या खिशातून गुंतवणूक करण्यात आली. पण नुकतेच विविध कंपन्यांच्या सहकार्याने ३५ कोटींचा निधी उभारण्यात आला आहे. ग्राहकाकडून येणारे पैसे हे कंपनीच्या खात्यात जमा होतात. त्यातील ८० टक्के भाग आम्ही चालकाच्या खात्यात जमा करतो. म्हणजे एका फेरीमागे २० टक्के कंपनीला मिळत असल्याचे प्रणव सांगतो. चालकांची जीवनशैली सुधारण्यासाठी दहावी आणि बारावीत चांगले गुण मिळवणाऱ्या त्यांच्या मुलांना कंपनीतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच चालकांना सवलतीच्या दरात इंधन मिळावे यासाठी विविध कंपन्यांशी सहकार्य करून एक कार्ड बनविण्यात आले आहे. यामुळे इंधनावर सूट मिळते. त्याचा फायदाही चालकांना होतो. तसेच गाडीसाठीचा विमा आम्ही एकत्रित करत असल्यामुळे चालकाला विम्याचा हप्ताही कमी पडतो. या सर्वातूनही चालकाचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढत असल्याचे प्रणव सांगतो. इतकेच नव्हे, तर गाडी खरेदीसाठी वित्त कंपन्यांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याचेही प्रणवने नमूद केले.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात चालकांच्या दृष्टीने त्यांना जीवनविमा देण्याचा आमचा मानस आहे. तर कंपनीचा विस्तार देशातील २० शहरांमध्ये करण्याचा मानस प्रणवने व्यक्त केला.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना आपल्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते. याचबरोबर आपला नफा कमावीत असतानाच ग्राहकांचे समाधानही महत्त्वाचे असते, कारण हेच समाधान तुमचा व्यवसाय वाढवणारे असते, असा सल्ला प्रणवने दिला आहे.

@nirajcpandi