गोमयापासून चिप तयार करून त्याद्वारे किरणोत्सार कमी होत असल्याबाबत केलेल्या संशोधनाचे सर्व तपशील खुले करण्याची मागणी शास्त्रज्ञांनी केली असून त्याबाबत राष्ट्रीय कामधेनू आयोगाला खुले पत्र लिहिले आहे.

‘गोमयापासून तयार केलेल्या चिपचा वापर मोबाइलमध्ये केल्यास किरणोत्सार रोखणे शक्य आहे,’ असा दावा राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांनी मंगळवारी केला. त्याला संशोधकांनी आव्हान दिले आहे. अशा स्वरूपाचे संशोधन कुठे झाले, कधी झाले, कुणी केले, त्यासाठी किती निधी वापरण्यात आला, तो कुणी दिला, संशोधन कोणत्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले, ज्या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले ती मान्यताप्राप्त पत्रिका आहे का, यात कोणते नियंत्रक वापरले, किती फोनवर याची तपासणी करण्यात आली आदी प्रश्नांची उत्तरे द्यावीत. हा आयोग सरकारी असल्यामुळे आयोगाने केलेले संशोधन जाणून घेण्याचा नागरिकांना हक्क आहे. दिलेली माहिती दावा सिद्ध करण्यास उपयुक्त नसल्यास हे छद्मविज्ञान ठरेल. त्याचबरोबर हे सांविधानिक मूल्यांचे उल्लंघन होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

काय झाले? : कथारिया यांनी दिल्ली येथे ‘गोमय दिवाळी’ साजरी करण्याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आयोगातर्फे मोबाइलमधील किरणोत्सार रोखणारी चिप गोमयापासून तयार करण्यात आल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर अनेक आजारांवरील उपचारांसाठीही ही चिप उपयुक्त ठरू शकते. हे संशोधन शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.