नवी दिल्ली : करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील १३ विरोधी पक्षांनी मोफत लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी रविवारी केंद्र सरकारकडे केली.

अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले ३५,००० कोटी रुपये या लसीकरणासाठी खर्च करावेत, असे विरोधकांनी म्हटले आहे.  देशातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना अखंडित प्राणवायू पुरवठा करण्याची मागणीही विरोधकांनी संयुक्त निवेदनाद्वारे केंद्राकडे केली आहे. या निवेदनावर कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (जेडीएस), राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल कॉंगे्रसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आदींसह १३ पक्षप्रमुखांच्या स्वाक्षऱ्या आहेत.