मंगळवारी सकाळी दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरल्यामुळे हे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही रुळावरुन हटण्यास विद्यार्थ्यांच्या जमावाने नकार दिल्याचं पाहायला मिळालं. या सर्व वातावरणात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली असून सत्ताधाऱ्यांवर या परिस्थितीचे खापर फोडण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरेंच्या मनसेने विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून, आता यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही उडी घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येऊन गर्दीच्या वेळी आंदोलन करतातच कसे, हाच प्रश्न उपस्थित केला जात असताना मुंडेंनी ट्विट करत जणू या प्रश्नाचे उत्तरच दिल्याचे पाहायला मिळत आहे.  ‘रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे तर गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. तसेच गेल्या तीन वर्षात सातत्यपूर्णपणे रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे’, असे ट्विट करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

वाचा : आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? – अरविंद सावंत

या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या…
* रेल्वे अॅक्ट अप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे.
* २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.
* रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची वन टाइम सेटलमेंट एका महिन्याच्या आत रेल्वे सेवेत समाविष्ट झालेच पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे नियम अटी लागू करु नये.
* रेल्वे अप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवेत समाविष्ट करणे आणि भविष्यातही नियम लागू ठेवावे.