कला वक्तृत्वाची : वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज

महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या राजधानीत एक अपूर्व सोहळा संपन्न होत आहे. मायभाषेच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण अनेक राज्यांतून, अनेक देशांतून येथे आला आहात.  मी आपणा सर्वाना मनापासून धन्यवाद देतो.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

आपण परप्रांतात, परदेशात राहता आहात. तेथील भाषांचा स्वीकार करणं, त्यात पारंगत होणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण ते बजावत असताही आपण आपल्या मायभाषेवरील प्रेम देवघरातील समईसारखं जागृत ठेवलं आहे. खेद या गोष्टीचा की खुद्द महाराष्ट्रात मात्र या समया मंदावत विझत चालल्या आहेत. आम्हीच त्या मालवत आहोत आणि जुन्या बाजारात समयांची किंमत किती याचा शोध घेत आहोत. स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्य स्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरही मराठीला आपलं हक्काचं सिंहासन अद्याप मिळालेलं नाही आणि ते मिळत नाही याचं कारण ते रिकामं नाही. या मातीशी कोणतंही नातं नसलेल्या एका परकीय भाषेनं इंग्रजीनं ते बळकावलेलं आहे.

मी इंग्रजी भाषेचा द्वेष तर करत नाहीच उलट त्या भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे. आपण सारेजण इंग्रजीचं ऋण कधी विसरू शकत नाही. केवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजे इंग्रजीनंच आमच्यासाठी उघडले आहेत.

कोणत्याही जिवंत समाजाची भाषा तळ्यासारखी सजीव नसते तर कालमानानं निर्माण होणाऱ्या नव्या ज्ञानाचे, विचारांचे, जाणिवांचे पाझर आत्मसात करीत पुढे जाणाऱ्या नदीसारखी प्रवाही असते. इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेवूनच ती प्रगती करू शकते. शुद्धतेच्या कर्मकांडांत रुतलेल्या आणि त्यामुळेच प्रगतीला पराङ्मुख झालेल्या भाषा मृत या सदरात कशा जमा होतात हे इतिहासानं दाखवलेलं आहे. हे भान मराठीनं आपल्या पंधरा शतकांच्या प्रवासात राखलेलं आहे आणि म्हणूनच नव्या युगाची आव्हानं पेलण्याचं सामथ्र्य तिच्या ठिकाणी आलं आहे. भाषा समर्थ आहे, पण तिच्या सामर्थ्यांसंबंधी साशंक असलेली आम्ही तिची अपत्यं मात्र दुबळी आहोत. तेव्हा आमचं वैर कोणत्याही भाषेशी नाही आणि मावशीच्या मायनं आमचं पालन करणाऱ्या इंग्रजीशी तर नाहीच नाही. मावशीबाईनं आता आईच्या घराचा कब्जा पुन्हा आईकडं द्यावा एवढीच आमची मागणी आहे. म्हणून आपल्यासमोर प्रश्न आहे तो इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा.

कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. सरकारी आणि निमसरकारी संस्थांत मराठीला अद्याप खालच्या मानेनंच वावरावं लागतं. पण मराठीला राजभाषेचं रास्त स्थान आज ना उद्या लाभेल. अधिक धोका आहे तो लोकभाषा म्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा.

मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचं स्थान कोणतं हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. मुंबई हे सर्वाश्रयी शहर आहे. विविध प्रांतांतील लोक येथे येतात, राहतात याचा आम्हाला अभिमान, आनंद वाटतो. पण मुंबईतील मजलेदार इमारती, त्या बांधणारे वा त्यात राहणारे कोणीही असोत त्या मराठी मातीवर उभारलेल्या आहेत.

मुंबई ही महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची जीवनधात्री माता आहे. या माऊलीच्या वत्स सावलीत कोणीही यावं, राहावं, निर्वाहसाधना करावी. अवश्य. ‘हे विश्वचि माझे घर’ हा संतांचा संदेश या मातीत रुजलेला आहे. पण आठ कोटींच्या या आईला धनसत्तेच्या बळावर आपली बटीक करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

महाराष्ट्राच्या अस्मितेवर संकट

मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरीलही संकट आहे. संस्कृतचं स्तोम माजवून तेव्हाचा पुरोहितवर्ग आपली सत्ता समाजावर गाजवत होता. आज त्या पुरोहितवर्गाची जागा इंग्रजीत पारंगत असलेल्या चार-पाच टक्के लोकांनी घेतली आहे. या पाच टक्केवाल्यांच्या प्रस्थापित हितसंबंधांसाठी आठ कोटी लोकांचं भवितव्य धोक्यात लोटायचं का याचा विचार गंभीरपणानं व्हायला हवा.

लोकभाषेवर आक्रमण..

  • सरकारी-निमसरकारी संस्थांमध्ये मराठीला मानच नाही
  • या भाषेला धनसत्तेच्या बळावर बटीक करण्याचा प्रयत्न करू नये
  • चार-पाच टक्के लोकांकडून मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात
  • मराठी भाषा नव्या युगाची आव्हाने पेलण्यास समर्थ

 

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’

 

संकलन –  शेखर जोशी

(जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या (१२ व १३ ऑगस्ट १९८९) उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नाटककार, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केलेल्या भाषणातील काही भाग)