विलगीकरणाचा कालावधी संपताच कारवाई; अमिताभ गुप्ता यांचा जबाब नोंदवून घेणार

विकासक व आर्थिक घोटाळ्यातील संशयित वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे गृह सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याच्या राज्यातील भाजप नेत्यांच्या आरोपांची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. विलगीकरणाची मुदत संपताच वाधवान यांना ताब्यात घेण्याचे आदेश केंद्राकडून अंमलबजावणी संचालनालयाला देण्यात आले.

दुसरीकडे, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून गुप्ता यांना चौकशीसाठी पाचारण करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल.

गुप्ता यांच्यावर कारवाई करायची असल्यास राज्य सरकार शुक्रवारीच त्यांना निलंबित करू शकले असते. मात्र केवळ सक्तीच्या रजेवर पाठवून तसेच चौकशीला पंधरा दिवसांची मुदत देऊन सरकार गुप्ता यांना वाचवत असल्याचा आरोप भाजपने केला. अंमलबजावणी संचालनालय तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेमार्फत वाधवान यांची आधीपासूनच चौकशी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात काही कारवाई करण्याची शक्यता कमी असल्याने अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी करण्याची भूमिका केंद्राने घेतली असावी, असेही सूत्रांनी सांगितले. याबाबत सौनिक यांच्याशी संपर्क साधला असता चौकशीसंदर्भातील आदेश आजच मिळाले असून लवकरच चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रफुल पटेल यांचा संबंध नाही

टाळेबंदी, प्रवेशबंदीचा आदेश मोडून महाबळेश्वरमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न केलेले वादग्रस्त उद्योगपती कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबीयांशी प्रफुल पटेल यांचा कोणताही संबंध नाही, असे समजते.

महागडय़ा मोटारी जप्त

वाधवान यांच्या पाच महागडय़ा मोटारी महाबळेश्वर पोलिसांनी जप्त केल्या. वाधवान यांना पाचगणीतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यासही स्थानिकांचा विरोध आहे.