लोटस ऑपरेशन असं काहीही नसतं, आमचे सुद्धा हात अशी अनेक ऑपेरशन करून अनुभवी झालेले आहेत. आमच्याकडे देखील ऑपरेशन थेटर्स आहेत. सगळ्यात जास्त चिरफाड ही नाजूक हातांनी आम्ही करू शकतो. आमचे मासे त्यांच्या जाळ्यात जाणार नाहीत, गळाला लागणार नाहीत, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधीपक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत भाजपाच्या ऑपरेशन लोटस बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ताधारी आमदार फुटतील यासाठी विरोधीपक्षाला अशाप्रकारचा भ्रम निर्माण करावा लागतो. विरोधीपक्षाच्या प्रमुख लोकांना अशा अफवा पसरवायच्या असतात व ते पसरवतात. हे काही फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही. देशात, जगात विरोधीपक्ष अशाप्रकराचे हातखंडे वापरत असतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील काय सांगत आहेत, देवेंद्र फडणवीस काय सांगत आहेत किंवा विरोधीपक्षाचे इतर नेते काय सांगत आहेत, त्याच्याकडे आम्ही एक मनोरंजन म्हणून पाहतो आणि जर आपण अशाप्रकारेच पाहिलं तर महाराष्ट्राची व सरकारची प्रकृती उत्तम राहते. अधुनमधुन राज्यकर्त्यांना व राजकारण्यांनी असे विनोदी कार्यक्रम पाहिले पाहिजे, याने छातीवरचं दडपण दूर होतं. ही भूमिका विरोधीपक्षाचे जे प्रमुख पात्र करत आहेत, त्याच्याबद्दल खरं म्हणजे राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांना रॉयल्टी दिली पाहिजे. कारण, ते महाराष्ट्राचं व आमच्या मंत्र्यांच एवढं मनोरंजन करत आहेत, म्हणून त्यांना एक मासिक बिदागी दिली पाहिजे. सांस्कृतिक मंत्र्यांनी यासंदर्भात एखादा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा. राजकराणता मनोरंज हवं, नाहीतर माणूस ओझी घेऊन निघून जातो. ही ओझी घेऊन आम्हाला राज्य करायचं नाही. आम्हाला हसत खेळत राज्य करायचं आहे. राज्य हसत खेळत ठेवण्याचं काम विरोधीपक्ष करत असेल तर त्यांच स्वागत आहे, असं संजय राऊ यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

विरोधीपक्षाचे लोकं माझ्याशी देखील बोलत असतात, मात्र मला ऑफर देण्याची हिम्मत नसते. पण विरोधीपक्ष असला तरी तो काही आपला शत्रू नाही. विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी, हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलतो. शरद पवार जेव्हा विरोधीपक्षात होते तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. विरोधीपक्षाशी संवाद ठेवणे हे सत्ताधाऱ्यांचं काम असतं. ते जरी आमच्याशी संवाद ठेवून असले तरी आमचे मासे त्यांच्या जाळ्यात जाणार नाहीत, गळाला लागणार नाहीत. त्यांना जे खेळ करायचे आहेत ते त्यांनी करत रहावेत, काहीही होणार नाही. कितीही ऑपरेश करू द्या, एकही ऑपरेश यशस्वी होणार नाही. हे आताच मी तुम्हाला सांगतो, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकार स्थापनेसंदर्भात मी पहिल्या दिवसांपासून खात्रीने सांगत होतो की, सरकार येईल. सरकार पाच वर्षे टिकेल या माझ्या विधानावर मी कायम आहे. विरोधकांना रात्री डोळे मिटली की सत्ता स्वप्नात येते. परंतु डोळे उघडले की सत्ता जाते, हा स्वप्नदोष आहे. अद्याप भाजपावाले धक्क्यातून सावरले नसतील, कारण हा त्यांना मोठा धक्का आहे. १०५ आमदार असतानाही त्यांना सत्ता मिळू शकली नाही, हा निश्चित लहान धक्का नाही. यातून त्यांना सावरायला वेळ लागेल. त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. आमच्या सरकारच्या वैद्यकीय मंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून विरोधीपक्षातील किती जणांना अशाप्रकारे मनोविकारतज्ज्ञाची किंवा समुपदेशनाची गरज आहे. याचा अभ्यास करून मुख्यमंत्र्याकडे एक अहवाल सादर केला पाहिजे, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला.

तसेच, विरोधीपक्षाने थोडा सकारात्मक विचार करायला हवा. मुख्यमंत्र्यांना काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यानंतर त्यांनी भूमिका मांडायला सुरूवात करायला पाहिजे. पहिल्या दिवसांपासूनच तुम्ही सभात्याग आदळआपट करणं योग्य नसल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितलं.