करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. अडत अडखळत गती पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईवर करोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि करोना प्रसाराचा वेग यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं तातडीनं पावलं उचलली असून, नियम व आदेशाचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शनिवारी रात्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘चुकीला माफी नाही’ म्हणत प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धडक कारवाई केली.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं बृहन्मुंबई महापालिकेनं करोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचं पालन होत नसल्याचं समोर येत असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील तीन रेस्टॉरंट आणि क्लबवर अचानक धाडी टाकल्या.

वांद्रे पश्चिम परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू टर्न स्पोटर्स बार आणि कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंट या तिन्ही रेस्टॉरंट व क्लबची पाहणी केली. यावेळी कोविड संदर्भात महापालिकेने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले जात असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. बांद्रा वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक विनामास्क असल्याचं आढळून आलं. महापालिकेनं आयरिश हाऊसकडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० हजार, यू टर्न स्पोर्टस बारला २० हजार कर्तार पिल्लर बार अॅण्ड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

दुबईहून आलेल्या चार जणांवर कारवाई

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई महापालिकेनं सात दिवसांसाठी क्वारंटाईन सक्तीचं केलं आहे. मात्र, दुबईतून आलेल्या चार प्रवाशांनी क्वारंटाईन नियमांचा भंग केला. सात क्वारंटाईन न राहता प्रवाशांनी मध्येच पोबारा केला. याप्रकरणी महापालिकेनं चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.