परवानगीच्या प्रक्रियेमुळे राणीच्या बागेतील सिंहदर्शनासाठी प्रतीक्षा कायम

प्रसाद रावकर
मुंबई : मुंबईकरांसोबतच देश-विदेशातील पर्यटकांना ऐटदार सिंहांच्या जोडीचे दर्शन घडाविण्यासाठी सोडलेला संकल्प पूर्ततेत एकामागून एक विघ्न येत आहेत. सिंह जोडीच्या बदल्यात देण्यासाठी झेब्य्राची जोडी मिळाल्यानंतर या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी पालिकेला अद्याप मिळालेली नाही. ही परवानगी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन मुंबईकर-पर्यटकांच्या सिंहदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाच्या (राणीची बाग) नूतनीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील विविध वन्यप्राणी राणीच्या बागेत आणण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जुनागड आणि इंदोर येथील प्राणिसंग्रहालयातून सिंहाची प्रत्येकी एक जोडी राणीच्या बागेत आणण्याची योजना आहे.

या योजनेनुसार पालिकेने जुनागड आणि इंदोर येथील प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधून सिंह जोडी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत उभय प्राणिसंग्रहालयांशी बोलणे झाले असून सिंह जोडीच्या बदल्यात दोन्ही प्राणिसंग्रहालयांना झेब्य्राची जोडी द्यावी लागणार आहे. राणीच्या बागेत झेब्रे नसल्यामुळे पालिकेला ती अन्य ठिकाणांहून मिळवून द्यावे लागणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने झेब्य्राच्या दोन जोडय़ा मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. केवळ देशांतीलच नव्हे तर परदेशांतील प्राणिसंग्रहालयांमध्ये यासाठी चाचपणी करण्यात आली. त्यात बराच वेळ गेला. आता इस्रायल येथे झेब््रय़ाच्या दोन जोडय़ा उपलब्ध असून त्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे झेब्रे देऊन सिंहाच्या जोडय़ा पालिकेला मिळवता येणार आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

झेब्रा जोडी देऊन सिंह जोडी मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी मिळावी यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाच्या प्रशासनाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाच महिन्यांपूर्वी पत्र पाठविले आहे. मात्र अद्याप त्याचे उत्तर वा परवानगी पत्र पालिकेला पाठविण्यात आलेले नाही. प्राधिकरणाकडून परवानगी मिळताच तात्काळ इस्रायलवरून झेब्रा जोडी आणून ती जुनागड आणि इंदोर येथीर प्राणिसंग्रहालयाला देण्यात येईल. त्यानंतर दोन्ही प्राणिसंग्रहालयांमधून राणीच्या बागेत सिंह जोडी आणण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.