पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदान होत असून त्यासाठी जिल्ह्य़ात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालघरची निवडणूक भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आव्हान तगडे आहे. जिल्ह्य़ातील दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापकी १४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पालघरबरोबरच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ लाख २४ हजार मतदार आहेत. त्यात सर्वाधिक चार लाख २९ हजार मतदार हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आहेत. या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात खऱ्या अर्थाने सामना आहे. काँग्रेस व माकपचे उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपची निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा असा हा सामना आहे. भाजपने ही जागा स्वत:कडे राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे कुणबी समाजाचे असून सुमारे चार लाख मतदान या एका समाजाचे या मतदारसंघात आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील हेमंत पटले हे भाजप उमेदवार भंडारा जिल्ह्य़ात फारसे परिचित नाहीत. तरीही त्यांची पोवार समाजाची मते अडीच ते तीन लाखांच्या घरात आहेत. मतमोजणी ३१ मे रोजी आहे.

 

LIVE UPDATES:

– कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही- निवडणूक आयोग

– राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेरमतदान घेण्याची केली मागणी

– पुन्हा निवडणुका घेण्याची प्रकाश आंबेडकर यांची मागणी

– भंडारा-गोंदिया मतदारसंघातील ३५ मतदान केंद्रावरील प्रक्रिया रद्द

– इव्हीएममधील बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्याचा प्रशासनाचा निर्णय

– भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १३.९० टक्के मतदान

– सकाळी ११ वाजेपर्यंत पालघरला १०.२७ टक्के मतदान

– भंडारा-गोंदिया मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान

– गोंदियात अनेक ठिकाणी इव्हीएम बंद पडल्याने  मतदारांचा खोळंबा, अनेक ठिकाणी मतदान थांबले

– पालघरमध्ये पहिल्या दोन तासांत ७ टक्के मतदान

– इव्हीएम बिघाडामुळे गोंदियात २५३ क्रमांकाचे बुथ बंद

– नाना पटोलेंनी केली भाजपा सरकारवर टीका

– गोंदिया मतदारसंघात माजी खासदार नाना पटोले यांनी केले मतदान

– भंडारा-गोंदिया मतदारसंघात ४६ गावांचा मतदानावर बहिष्कार

– नक्षलग्रस्त भिवखिडकी नवेगाव बांध येथील मतदान केंद्रावरील इव्हीएम बंद

– भंडाऱ्यातील खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे इव्हीएम बंद

– भंडाऱ्यात तुमसर तालुक्यात ११ इव्हीएम बंद

– पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी सहकुटुंब मतदान केले

– भाजपा रडीचा डाव खेळतोय, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचा आरोप

– बहुजन विकास आघाडीची अर्धा तास वेळ वाढवून देण्याची मागणी

– पालघरमधील सायवन येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावरील इव्हीएममध्ये बिघाड

– विरारच्या मतदान केंद्रावर अचानक वीज गेली. अंधारात मतदान सुरू

– निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर

– भंडारा-गोंदियात एकूण १८ उमेदवार रिंगणात

– भंडाऱ्यात २१२६ मतदान केंद्र

– सकाळी ७ पासून मतदानास सुरूवात

– निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर

– भंडारा-गोंदियात एकूण १८ उमेदवार रिंगणात

– भाजपा खासदार चिंतामण वनगांच्या निधनामुळे पालघरमध्ये तर खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक