अंगणवाडी कृती समितीचा घणाघाती हल्ला

सरकारकडून महिने महिने पोषण आहार मिळत नसतानाही पदराला खार लावून राज्यातील ७३ लाख बालकांना आईच्या ममतेने पोषण आहार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना संपकाळातील १२५ बालमृत्यूंबाबत जबाबदार धरू पाहणाऱ्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे या ‘पुतना मावशी’ आहेत असेच म्हणावे लागेल. संप करायची आम्हाला हौस नव्हती आणि संप सुरु केल्यानंतर तो फोडण्याचे उद्योग करून आमचा संप लाबविणाऱ्या पंकजा मुंडे याच संपकाळातील बालमृत्यूंना जबाबदार आहेत, असा घणाघाती हल्ला राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी केला.

विधिमंडळात अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याच्या निर्णयावरून शिवसेना तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस एकवटले असून सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र अंगणवाडी सेविकांनी २६ दिवस केलेल्या संपकाळात १२५ बालकांचे मृत्यू झाल्याचे सांगत अंगणवाडी सेविकांनाच अप्रत्यक्ष या मृत्यूला जबाबदार धरत पंकजा मुंडे यांनी मेस्माचे समर्थन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही १२५ बालमृत्यू सहन केले जाणार नाहीत असे सांगितले. यावर भाजप सरकार कृतध्न असून विरोधी पक्षात असताना याच भाजपचे नेते अंगणवाडी सेविकांना २० हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे असे सांगयचे ते आज आम्हाला मेस्मा लावून आमच्या अंगणवाडी सेविकांच्या ममतेची थट्टा करत आहेत अशी खंत शुभा शमीम यांनी व्यक्त केली. मुळात अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यासाठी पंकजा मुंडे यांनीच एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल तसेच कृती समितीचे सदस्य होते. र्सवकष चर्चेनंतर तयार करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात किमान साडेदहा हजार रुपये ते साडेतेरा हजार रुपये अंगणवाडी सेविकांना देण्याची शिफारस करण्यात आली व तो अहवाल सरकारने स्विकारला. मात्र त्याची  अंमलबजावणी न करता आम्हाला सरकारने संप करण्यास भाग पाडले.

अनेकदा चर्चा करूनही समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी न करणे,अंगणवाडी सेविकांना सेवाज्येष्ठता न देणे, पोषण आहाराचा निधी वेळेवर उपलब्ध करून न देणे, लहान मुलांची वजन घेण्याची बंद असलेली उपकरणे बदलून देणे, अंगणवाडय़ांचे भाडे वाढवणे तसेच पोषण आहारासाठी केंद्राच्या शिफारशीनुसार नऊ रुपये ते १५ रुपये देणे यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळेच अंगणवाडी सेविकांना संप करावा लागला. संप काळात चर्चेच्या नावाखाली १५०० रुपयांची वाढ जाहीर करून संप फोडण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केल्यामुळेच संप लांबला. त्यामुळे संपकाळातील १२५ बालमृत्यूंना  पंकजा मुंडे याच जबाबदार असल्याचे एम. ए. पाटील म्हणाले. शासनाकडून आठ आठ महिने पोषण आहाराचे पैसे मिळत नव्हते तेव्हा बचत गट व अंगणवाडी सेविकांनीच आईच्या ममतेने स्वत:ची मंगळसूत्रे गहाण ठेवूनही या मुलांना पोषण आहार दिलेला आहे. त्यावेळी भाजपचे पंकजा मुंडे यांच्यासह मेस्माचे समर्थन करणारे अन्य मंत्री होते कोठे असा सवाल करून पंकजा मुंम्डे या पुतना मावशीप्रमाणे वागत असल्याची जोरदार टीका एम. ए. पाटील यांनी केली.

सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे वजन घेण्यासाठी जी उपकरणे आहेत त्यातील निम्म्याहून अधिक नादुरुस्त असून वारंवार सांगूनही सरकार बदलून देत नाही. त्यामुळे कुपोषित बालकांची खरी आकडेवारी बाहेर येऊ शकत नाही, असे शुभा शमीम यांनी सांगितले. पोषण आहाराचा निधी, अंगणवाडी सेविकांचे मानधन,आरोग्य तपासणी, बालकांचे शिक्षण व पोषण आहाराची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी पुस्तकेवेळेवर देण्याची मागणी वारंवार करूनही ती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना मेस्मा का लावत नाही, त्यांची जबाबदारी अत्यावश्यक सेवा या सदरात का घेतली जात नाही, असा सवालही शुभा शमीम यांनी केला.