शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना चौथऱ्यावर प्रवेश बंदी असेल, तर तो त्यांचा अपमान कसा ठरतो? असा धक्कादायक प्रश्न राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर प्रथा-परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी ही भूमिका मांडली.
भेदाभेद भ्रम अमंगळ!
गेल्या आठवड्यात शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश करून एका तरुणीने शनी महाराजांना तेल वाहिले होते. या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश करण्यास बंदी असतानाही तरुणीने हे पाऊल उचलल्यामुळे गावात एक दिवस बंद पुकारण्यात आला होता. या घटनेनंतर सामाजिक क्षेत्रात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी त्या तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले होते. त्याचवेळी ग्रामस्थांनी या घटनेनंतर मंदिर समितीवर टीकेची झोड उठविली होती. या घटनेनंतर त्या दिवशी चौथऱ्याजवळ उपस्थित असलेल्या सात सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी दुग्धाभिषेक घालून शनी महाराजांच्या चौथऱ्याचे शुद्धिकरण करण्यात आले होते.
शनी मंदिरात महिलांना अभिषेकालाही परवानगी
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, यामध्ये कोणत्याही महिलेने मानापमान वाटून घेण्याचे कारणच नाही. मारूतीच्या मंदिरातही महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेने अपमान वाटून घेण्याचे कारण नाही. समाजात मुलींना जन्मालाच येऊ न देणे, त्यांना शिक्षणाची संधी न देणे, नोकरीमध्ये त्यांना डावलणे हा त्यांचा अपमान आहे, असे मी मानते, असे त्यांनी सांगितले.