दिवसाला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल देणाऱ्या राज्यातील मोजक्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी एक असणाऱ्या पनवेल आरटीओकडे वाहने उभी करण्यासाठी सध्या थोडीही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नोंदणीसाठी आलेली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला असून सध्या सिडको अधिकाऱ्यांच्या मिनतवाऱ्या करून ट्रक ट्रर्मिनलच्या जागेवर ही वाहने उभी करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्य़ाचा अर्धा भाग पनवेल आरटीओच्या अखत्यारीत येतो. पनवेल, उरण भागात झपाटय़ाने होणाऱ्या विकासामुळे या ठिकाणी जमिनींना सोन्याचा भाव आला असून वाहने घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
त्यामुळेच गतवर्षी या आरटीओद्वारे २३० कोटी ६९ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने या कार्यालयाला १८९ कोटी रुपयांचे लक्ष्य दिले होते, पण त्याऐवजी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे या कार्यालयाने ४१ कोटी रुपये जास्त जमा करून एक नवीन आदर्श राज्यातील आरटीओ कार्यालयांपुढे ठेवला आहे. कोकण विभागातील पेण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आरटीओमध्ये हा सर्वाधिक महसूल असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी सांगितले. या भागात चालणाऱ्या रेती उत्खनन आणि इतर बांधकाम साहित्याशी निगडित व्यवसायामुळे आरटीओने गतवर्षी पाच हजार ६०० वाहनांवर आरटीओने धडक कारवाई केलेली आहे. काही वर्षांतील सर्वाधिक कारवाई असल्याचे मानले जाते.
दररोज सरासरी एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या या कार्यालयाचे सध्या मात्र वेगळे दुखणे असून, या कार्यालयासाठी जवळपास वाहनतळ म्हणून एक इंच मोकळी जागा नाही. कळंबोली लोखंड बाजारातील सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग इमारतीत असणाऱ्या सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळ जागेत केवळ कार्यालय थाटण्यात आले आहे, पण नोंदणीसाठी येणाऱ्या हजारो वाहनांना उभे राहण्यास जागा नाही. त्यामुळे सिडकोच्या ट्रक टर्मिनल किंवा जवळच असणाऱ्या एका खासगी भूखंडावर वाहने उभी करून आज वेळ मारून नेली जात आहे. या दोन्ही जागा मिळाव्यात यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कृष्णदेव जाधव यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत, पण सिडकोची ही कृपा जास्त काळ राहणार नाही. या जागांवर वाहने उभी करणाऱ्या ट्रकचालक संघटनेची आरटीओची वाहने उभी करण्यास हरकत आहे. त्यामुळे या आरटीओसाठी मोकळ्या जागेची गरज असल्याचे दिसून येते.