News Flash

अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा!

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत आधीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांना माहिती दिली होती, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामधून खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यासोबतच, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या या प्रकाराबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर काही मंत्र्यांना देखील सांगितलं असल्याचा दावा पत्रामधून केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यामुळे विरोधकांकडून या मुद्द्यावरून रान उठवलं जाण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबच्या बार, रेस्टॉरंट आणि इतर मार्गांनी महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यामध्ये हे आरोप केले आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांना देखील या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला आहे.

काय लिहिलंय पत्रामध्ये?

पत्रामध्ये परमबीर सिंग म्हणतात, “अँटिलिया प्रकरणाविषयी मार्च महिन्यात जेव्हा मला रात्री उशिरा वर्षावर बोलवण्यात आलं, तेव्हा गृहमंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींबाबत मी सांगितलं होतं. याच गोष्टींबाबत मी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर वरीष्ठ मंत्र्यांना देखील माहिती दिली होती. मी माहिती दिली, तेव्हा मला जाणवलं की काही मंत्र्यांना याबद्दल आधीच माहिती होतं”, असा गंभीर दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.

 

दरम्यान, परमबीर सिंग यांनी केलेल्या या उल्लेखांमुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खुद्द शरद पवार यांनी राज्य सरकारमधील इतर काही मंत्र्यांना देखील येत्या काही दिवसांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची आणि त्यांच्याकडून खुलासे मागितले जाण्याची शक्यता आहे.

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 8:15 pm

Web Title: parambir singh letter allegations anil deshmukh mentions cm uddhav thackeray ajit pawar sharad pawar pmw 88
Next Stories
1 “गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!
2 मुंबई महानगर पालिकेच्या लसीकरणाला केंद्राचा ‘गो स्लो’!
3 करोना लसीकरणासाठी आता हाफकिन संस्थेची होणार मदत? मुख्यमंत्री म्हणाले…
Just Now!
X