अंदाजित खर्चापेक्षा कंत्राटदाराची ३५ टक्के  कमी दराची बोली

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : परळमध्ये पालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या उद्यानासाठी अंदाजित खर्च ३.७० कोटींचा असताना कंत्राटदाराने ३५ टक्के कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाची फेरतपासणी करण्याची मागणी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.

परळमधील नगर भूक्रमांक २११ हा भूखंड उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आला असून त्याचा विकास करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यात हिरवळ, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बैठक व्यवस्था, विद्युत एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. वर्षभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. याकरिता पालिका प्रशासनाने ३.७० कोटींचा अंदाजित खर्च काढला होता व निविदा मागवल्या होत्या. मात्र जे कंत्राटदार पुढे आले आहेत, त्यांनी अंदाजित खर्चापेक्षा कमी बोली लावली आहे.

त्यात ३५ टक्के कमी दरात काम करून देण्याची तयारी दर्शवणाऱ्या कंत्राटदाराची शिफारस प्रशासनाने केली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र अंदाजित रकमेपेक्षा कमी दरात काम होणार का, असा सवाल उपस्थित करीत भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

शिफारस केलेल्या कंत्राटदाराने २.४२ कोटीत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापैकी ८३ लाख हे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम आहे. मग १ कोटी ६० लाखांत दर्जेदार काम होणार का, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केला. उद्यान विभागाचे अनेक प्रस्ताव मंजूर होतात, पण प्रत्यक्षात कामे होत नाहीत. तसेच अंदाजित रक्कम आणि प्रत्यक्ष कामाचा खर्च यात इतकी तफावत असल्यामुळे या दरांची दक्षता विभागाकडून चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

‘कमी खर्चात काम होईल का?’

अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु यांनी सांगितले की, कामाचे दर ठरलेले असतात. मात्र कंत्राटदाराकडे स्वत:चे मनुष्यबळ असले की खर्च कमी होतो. दरांची फेरतपासणी करून इतक्या कमी खर्चात काम होईल का, त्याची माहिती देण्याचे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या वेळी दिले.