पालिका वाहनतळ प्राधिकरण स्थापन करणार

मुंबई : मुंबईत घर घेणे हे जितके मुश्कील आहे तितकेच गाडी उभी करण्यासाठी जागा शोधणेही अवघड आहे. मात्र येत्या काही काळात मोबाइलवरून गाडीसाठी जागा आरक्षित करता येणे शक्य आहे. मुंबईतील सर्व वाहनतळांचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. त्याकरिता पालिकेने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तर वाहनतळांची भौगोलिक माहिती गोळा करून त्या माहितीचा नकाशा तयार करण्याचे काम टाटा सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे.

मुंबईत दिवसेंदिवस वाहनतळांची समस्या बिकट होत चालली आहे. अनेकदा वाहनचालकांना गाडी उभी करण्यासाठी जागा शोधताना त्या परिसरात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. या सगळ्या गोंधळावर उपाय शोधण्यासाठी वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण गठन करावे अशी शिफारस विकास आराखडय़ात करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्राधिकरणाची निर्मिती करण्याकरिता अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यात वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य आहेत.

शहरातील वाहतुकीची चलनशीलता सुधारणे, वाहनतळ व्यवस्थापनाचे एकात्मीकरण, नावीन्यपूर्ण पद्धतीने रस्त्यावरील वाहनतळांचे व्यवस्थापन करणे, वाहनतळ दरात सुसूत्रीकरण करणे, रस्त्यालगतच्या वाहनतळांचा विकास व व्यवस्थापनाचे नियमन, वाहनतळाची संकल्पचित्रे, वाहनतळ परवाने देणे अशी कामे या प्राधिकरणाला करावी लागणार आहेत. वाहनतळांची माहिती भौगोलिक माहिती प्रणालीवर टाकणे, अ‍ॅप विकसित करणे, वाहनतळांच्या माहितीचा नकाशा तयार करणे, गाडी पार्किंगची जागा ऑनलाइन पद्धतीने राखीव करण्यासाठी पूर्वपाहणी करून विस्तृत माहिती संकलित करणे ही कामे टाटा सामाजिक विज्ञान संस्था करणार आहे.