मुंबई : वाशी येथे ठाणे खाडीवर बांधण्यात येणाऱ्या नियोजित पुलाचा प्रकल्प हाती घेतानाच विस्तार करून पारसिक डोंगरांखालून खारघपर्यंत बोगदा बांधण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसे झाल्यास मुंबईहून पुण्याकडे, तळोजाकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन आणखी सोपे होईल, असा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई आणि नवी मुंबई-पुण्याला जोडण्यासाठी वाशी येथील ठाणे खाडीवरील एक जुना पूल आणि सध्या वापरात असलेला १९९० च्या दशकात बांधण्यात आलेला पूल आता वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. रोज लाखो वाहने या पुलावरून ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. एका अंदाजानुसार रोज दोन लाखांहून अधिक वाहने रोज वाशी पुलावरून जातात. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने या खाडीवर आणखी दोन पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येकी सहा पदरी असे हे दोन पूल असतील व त्यास ७७५ कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. ठाणे खाडीवर वाशी येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाची लांबी १८३७ चौरस मीटर असेल. सध्या असलेल्या सहा पदरी पुलाच्या दक्षिण व उत्तर बाजूस सहा पदरी पुलांची दोन पूल बांधण्यात येणार आहेत. अवजड वाहनांना दोनपैकी एकाच पुलावर प्रवेश देण्यात येणार आहे. या दोन पुलांमुळे ये-जा करण्यासाठी दोन पुलांवर मिळून एकूण १२ मार्गिका उपलब्ध होतील.

हा पूल बांधल्यानंतर मुंबईहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची-अवजड वाहनांची आणि तिकडून येणाऱ्या वाहनांची पुलाच्या आसपास होणारी कोंडी दूर होणार आहे. मात्र या पुलावरील वाहने नवी मुंबईत शिरल्यानंतर तेथे वाहनांची गर्दी होईल. पुण्याकडे-कळंबोली-तळोजा एमआयडीसीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्यामुळे प्रामुख्याने ती समस्या होऊ शकते. त्यामुळे तळोजा एमआयडीसी, पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना थेट खारघपर्यंत जाता यावे यासाठी पारसिक डोंगरांच्या खालून बोगदा काढून नवीन पुलावरून येणाऱ्या वाहनांना थेट मार्ग काढून देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. अद्याप त्यावर विचार सुरू आहे.

संकल्पना मान्य झाल्यास त्याचे रूपांतर अधिकृत प्रस्तावात होईल आणि तो मंजुरीसाठी येईल,  असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलाचा नवीन प्रकल्प हाती घेतला जात असतानाच याबाबतही नियोजन झाल्यास त्यादृष्टीने पुढील अंमलबजावणी सोपी होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सातशे कोटींवर खर्च

मुंबई आणि नवी मुंबई-पुण्याला जोडण्यासाठी वाशी येथील ठाणे खाडीवरील एक जुना पूल आणि सध्या वापरात असलेला १९९० च्या दशकात बांधण्यात आलेला पूल आता वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे.वाशी खाडीवरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपये सिडकोमार्फत राज्य रस्ते विकास महामंडळास देण्यात येतील. तर बॉंडच्या रूपात ३२५ ते ३७५ कोटी रुपये उभारण्याचा विचार आहे.